पत्रकार रविंद्र वाघ यांना सन्मान पुरस्कार जाहीर


पत्रकार रविंद्र वाघ यांना सन्मान पुरस्कार जाहीर
बुलढाणा (प्रतिनिधी )
         मराठी पत्रकारितेचे जनक दर्पणकार आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांच्या जयंतीनिमित्त जनजागृती सेवा संस्था (रजि.), ठाणे यांच्या वतीने दैनिक अखंड झेप चे संपादक, निर्भीड पत्रकार सर्वसामान्य माणसाचा बुलंद आवाज म्हणून ओळखले जाणारे रवींद्र रामभाऊ वाघ यांचा सन्मान पुरस्कार देऊन गौरव करण्यात येणार आहे. हा सन्मान सोहळा 6 जानेवारी 2026 रोजी नवीन वर्षाच्या पहिल्याच आठवड्यात पार पडणार असून त्यांच्या प्रदीर्घ, समाजाभिमुख पत्रकारितेच्या कार्याची ही दखल घेतली आहे.
       रवींद्र रामभाऊ वाघ यांनी गेल्या अनेक वर्षांपासून पत्रकारितेला केवळ व्यवसाय न मानता समाजसेवेचे माध्यम म्हणून जोपासले आहे. सध्याच्या संगणकीय युगात, वाढत्या स्पर्धेच्या काळात वर्तमानपत्र चालवणे ही मोठी कसरत ठरली आहे. दैनिक अखंड झेपच्या माध्यमातून त्यांनी समाजजागृतीचे कार्य अखंड सुरू ठेवणे, हे त्यांच्या पत्रकारितेतील निष्ठेचे प्रतीक आहे.
       जनजागृती सेवा संस्थेचे संस्थापक अध्यक्ष गुरुनाथ तिरपणकर , सचिव संचिता भंडारी यांनी जाहीर केलेल्या माहितीनुसार, लोकशाहीचा चौथा स्तंभ बळकट ठेवण्यासाठी निर्भीड, नि:स्पृह आणि जनहितासाठी झटणाèया पत्रकारांची आज नितांत गरज आहे. त्यात रवींद्र रामभाऊ वाघ यांचे कार्य हे नवोदित पत्रकारांसाठी प्रेरणादायी असून, त्यांच्या लेखणीला अधिक बळ मिळावे या उदात्त हेतूनेच हा सन्मान देण्यात येत आहे. या सन्मानाच्या घोषणेनंतर पत्रकारिता क्षेत्रात, सामाजिक कार्यकर्त्यांमध्ये तसेच सामान्य नागरिकांमध्ये समाधान व्यक्त केले जात आहे. रवींद्र वाघ हे मेहकर तालुक्यातील सारशिव येथील रहिवासी आहेत.