मेहकर : (एशिया मंच न्यूज )
राज्यातील आगामी महानगरपालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या वतीने ४० जणांची स्टार प्रचारकांची यादी राज्य निवडणूक आयोगाकडे सादर करण्यात आली असून, या यादीत मेहकरचे शिवसेना आमदार सिद्धार्थ खरात यांचा समावेश करण्यात आला आहे. या निर्णयामुळे मेहकर मतदारसंघात शिवसैनिकांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे.
नुकत्याच पार पडलेल्या मेहकर नगरपालिका निवडणुकीत आमदार सिद्धार्थ खरात यांच्या कुशल नेतृत्वाखाली, योग्य रणनीती आणि प्रभावी नियोजनामुळे शिवसेनेने घवघवीत यश संपादन केले. या निवडणुकीत शिवसेनेचा भगवा मेहकर नगरपालिकेवर फडकला असून, शिवसेना शहरप्रमुख किशोर भास्करराव गारोळे यांची नगराध्यक्षपदी निवड झाली आहे. हे यश केवळ स्थानिक पातळीवरच नव्हे, तर राज्यस्तरावरही दखल घेण्याजोगे ठरले आहे. या उल्लेखनीय यशाची दखल घेत शिवसेना नेतृत्वाने आमदार सिद्धार्थ खरात यांची स्टार प्रचारक म्हणून निवड केली आहे. महानगरपालिका निवडणुकांमध्ये पक्षाच्या प्रचाराची धुरा सांभाळण्यासाठी त्यांच्यावर जबाबदारी सोपविण्यात आल्याने त्यांच्या कार्यशैलीवर व नेतृत्वगुणांवर पक्षाचा असलेला विश्वास अधोरेखित झाला आहे. आमदार सिद्धार्थ खरात यांचा स्टार प्रचारक यादीत समावेश झाल्याची माहिती मिळताच शिवसैनिकांनी आनंद व्यक्त केला.
या निर्णयामुळे मेहकर मतदार संघाचा राजकीय दबदबा वाढला असून, आगामी महानगरपालिका निवडणुकांमध्ये शिवसेनेला याचा निश्चितच फायदा होईल, असा विश्वास शिवसैनिकांकडून व्यक्त करण्यात येत आहे.
