* मेहकरात ६ ते २५ जानेवारीदरम्यान राबवणार व्यापक अभियान; काम, स्वच्छता, नियोजन त्रिसूत्रीवर आखणार आराखडा
मेहकर : (एशिया मंच न्यूज )
नवनिर्वाचित नगराध्यक्ष किशोर गारोळे यांनी स्वच्छतेचा नारा दिला असून मेहकरात ६ ते २५ जानेवारीदरम्यान २० दिवसांचे व्यापक स्वच्छता अभियान राबवण्यात येणार आहे. हाती झाडू घेत त्यांनी काम, स्वच्छता आणि नियोजन' या तीन सूत्रांवर शहराचा नव्याने आराखडा आखण्याची सुरुवात केली आहे.
स्वच्छता अभियानाची सुरुवात शारंगधर येथील बालाजी मंदिर परिसरात झाडू हातात घेऊन करण्यात आली. केवळ औपचारिक उद्घाटन न करता प्रत्यक्ष कृतीतून संदेश देत नगराध्यक्षांनी प्रशासनाला 'कामात गती आणा' असा स्पष्ट इशारा दिला. पहिल्या टप्यात शहरातील मुख्य रस्ते, नाले, सार्वजनिक ठिकाणे, वसाहती आणि परिसर स्वच्छतेवर भर दिला जाणार आहे. यावेळी आमदार सिद्धार्थ खरात, नगरसेवक, विविध पदाधिकारी, पालिकेचे कर्मचारी, युवक, महिला बचत गट, शेतकरी संघटना मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.
'स्वच्छता ही केवळ मोहीम नसून शहराची सवय व्हावी,' असा ठाम संदेश देत लोकसहभागाशिवाय विकास शक्य नाही, हेही यावेळी अधोरेखित करण्यात आले. पदभार स्वीकारताच थेट कामाला सुरुवात झाल्याने प्रशासनात सकारात्मक हालचालींना वेग आला आहे. हे अभियान केवळ नव्याची नवलाई न राहता निरंतर सुरू रहावे, अशी अपेक्षा नागरिक व्यक्त करत आहेत.
