जळगाव जामोद पंचायत समितीला आशा गटप्रवर्तक व अंगणवाडी कर्मचाऱ्यांचा घेराव..!

जळगाव जामोद पंचायत समितीला आशा गटप्रवर्तक व अंगणवाडी कर्मचाऱ्यांचा घेराव..!
जळगाव जामोद : (एशिया मंच न्यूज )
             गेल्या ५ वर्षापासून थकीत असलेला २३ महिन्यांचा कोरोणा भत्ता आशा वर्कर्स गटप्रवर्तक, अर्धवेळ स्त्री परिचारिका आणि अंगणवाडी सेविका मदतनीस यांचा ग्रामपंचायत स्तरावर थकीत असलेला 23 महिन्याचा कोरोना भत्ता तातडीने देण्यात यावा यासाठी  ९ जानेवारी रोजी जळगाव जामोद पंचायत समितीच्या कार्यालयास सीटूचे जिल्हा अध्यक्ष कॉ.पंजाबराव गायकवाड, अंगणवाडी कर्मचारी संघटनेच्या राज्य उपाध्यक्ष प्रतिभा पाटील, कोषाध्यक्ष सरला मिश्रा, तालुका सचिव सविता चोपडे, अध्यक्ष लक्ष्मी गवई यांच्या नेतृत्वात घेराव घालण्यात आला. राज्य आयुक्त आणि जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांचे या संदर्भात पत्र असून सुद्धा अद्याप कोरोना भत्ता मिळालेला नाही. सीटू च्या नेतृत्वात  यासाठी राज्य आयुक्तांपासून तर जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या पर्यंत संघटनेने वेळोवेळी सतत पाठपुरावा केला. जिल्ह्यातील प्रत्येक ग्रामंचायत कार्यालयास अंगणवाडी सेविका व आशा वर्कर्स, अर्धवेळ स्त्री परिचारिका यांनी वैयक्तिकरित्या लेखी पत्रव्यवहार सुद्धा केला. परंतू त्याकडे दुर्लक्ष करण्यात आले. कोरोना काळात आपल्या जिवाची पर्वा न करता अत्यंत तूटपूंजा मोबदला असताना जिल्ह्यातील एकाही ग्रामपंचायतला त्यांच्या कामाची दखल घ्यावी वाटली नाही. त्यामुळे संतप्त झालेल्या तालुक्यातील आशा वर्कर्स गटप्रवर्तक आणि अर्धवेळ स्त्री परिचारिका आणि अंगणवाडी सेविका मदतनीस यांनी स्थानिक जळगाव जामोद पंचायत समितीला घेराव घालण्याचा निर्णय घेतला.
      कोरोना काळात आपल्या जीवाची पर्वा न करता जिल्ह्यातील अंगणवाडी सेविका मदतनीस, आशा वर्कर्स गटप्रवर्तक, आणि अर्धवेळ स्त्री परिचारिका यांनी लोकांमध्ये जाऊन आरोग्याची काळजी घेणे, स्थलांतरितांचा सर्वे करणे, कोविड-19 निगडित सर्व कामे, महा आयुष्य सर्वे करणे इत्यादी स्वरूपाचे महत्त्वाची आरोग्य विषयक कामे अहोरात्र केली.            जागतिक आरोग्य संघटनेने WHO ने हेल्थ ऑफ लीडर ही उपाधी देऊन त्यांना सन्मानित केले. सरकारने आयुक्त स्तरावरून याच कामाचा दोन वर्षाचा कोरोना विशेष भत्ता देण्याचे परिपत्रक दोनदा काढले. त्याचाच आधार घेऊन मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद बुलढाणा यांनी सुद्धा 30 /10 /2025 रोजी जिल्ह्यातील ग्रामपंचायत यांना पंचायत समिती मार्फत आदेशीत केले. संघटनेच्या वतीने सुद्धा वेळोवेळी ग्रामपंचायत स्तरावर कोरोना भत्ता मिळावा. यासाठी जिल्हाभर प्रत्येक ग्रामपंचायतीला निवेदन देण्यात आली. परंतु ग्रामपंचायत स्तरावर सातत्याने या प्रश्नांकडे दुर्लक्ष करून टाळाटाळ करण्यात आली. काम करून सुद्धा जर मोबदला मिळत नसेल तर आंदोलन केल्या शिवाय पर्याय नाही. ही संतप्त भावना घेऊन ७ जानेवारी रोजी जळगाव जामोद पंचायत समिती कार्यालयासमोर कोरोना भत्ता तातडीने देण्यात यावा म्हणून आंदोलन करण्यात आले. यावेळी आंदोलन कर्त्यांनी प्रचंड घोषणाबाजी करीत पंचायत समिती परिसर दणाणून सोडला. कोरोना भत्ता आमच्या हक्काचा ! नाही कोणाच्या बापाचा ! हम अपना हक्क मांगते है ! नही किसी से भीक मांगते ! असा कसा देत नाही घेतल्या शिवाय राहणार नाही अशा घोषणांनी परिसर दणाणून गेला.
          ५ जानेवारी रोजी मोताळा येथून सूरू झालेले हे आंदोलनाचे वादळ, ६ जानेवारी रोजी मलकापूर,  ७ जानेवारी रोजी नांदुरा येथे पार पडले. ८ जानेवारी रोजी चिखली पंचायत समिती कार्यालयासमोर आंदोलन करण्यात आले. तर १३ जानेवारी रोजी संग्रामपूर पंचायत समिती समोर आंदोलन करण्यात येणार आहे.
             ९ जानेवारी रोजी जळगाव जामोद पंचायत समितीला घेराव घालून ठिय्या आंदोलन करण्यात आले. पंचायत समितीचे गट विकास अधिकारी मोरे यांनी आंदोलनाचे निवेदन स्विकारून तालुक्यातील ग्रामपंचायत कार्यालयास पत्र देऊन तातडीने कार्यवाही करण्याबाबत आश्वासन दिले. 13 जानेवारी रोजी संग्रामपूर येथे पंचायत समिती समोर आंदोलन करण्याचा निर्णय सिटूच्या नेतृत्वात संघटनेने घेतला आहे. या आंदोलनाचा शेवट हा मातृतिर्थ सिंदखेडराजा येथे करण्यात येणार आहे. जिल्हाभर करण्यात येत असलेल्या या तालुका पातळीवरील आंदोलनाची जर सरकारने गांभीर्याने तात्काळ दखल घेऊन कोरोना भत्ता अदा केला नाही. तर जिल्हास्तरांवर १२ फेब्रुवारी रोजी मोठे आंदोलन करण्याचा निर्धार सुद्धा सीटू संघटनेने केलेला आहे. 
      या आंदोलनात जिल्हा अध्यक्ष कॉ.पंजाबराव गायकवाड, प्रतिभा पाटील,सरला मिश्रा, छाया गावंडे, सत्यभामा पांडे, सविता चोपडे, लक्ष्मी गवई, ललिता बोदडे, उषा पडोळ, मंदा मिसाळ, राजेश्री नेमाडे, कल्पना नाये, ज्योती ताडे, विद्या इंगळे, सविता गावत्रे, प्रविणा घाईट, विजया जाधव, वंदना वानखेडे , प्रविणा बगाडे, विमल रवंदळे इत्यादी सह मोठ्या संख्येने आशा, गटप्रवर्तक आणि अंगणवाडी कर्मचारी, अर्धवेळ स्त्री परिचारिका सहभागी झाल्या होत्या.