* बुलढाण्यात मराठी पत्रकार दिनी मान्यवरांचे गौरवोद्गार
* पत्रकार कुटुंबीयांसाठी आरोग्य शिबिर उत्साहात
बुलढाणा : (एशिया मंच न्यूज )
आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांनी ६ जानेवारी १८३२ रोजी दर्पण हे वृत्तपत्र सुरू करीत मराठी पत्रकारितेची पायाभरणी केली. यामुळे, हा दिवस मराठी पत्रकार दिन म्हणून साजरा केला जातो. जिल्हाभरात ठिकठिकाणी पत्रकार दिन साजरा होत असताना, बुलढाण्यात जिल्हा पत्रकार संघातर्फे आयोजित कार्यक्रमाने तमाम पत्रकारांच्या भावनांचा आदर करत, पत्रकारितेच्या संघर्षाचा आढावा घेतला. नवनिर्वाचित नगराध्यक्ष पूजा गायकवाड यांचा सत्कार आणि पत्रकार कुटुंबीयांसाठी आरोग्य शिबिर अशा दोन सत्रात झालेल्या कार्यक्रमात केवळ ‘पत्रकार’ हा विषय केंद्रस्थानी ठरला. मान्यवरांनी आपल्या भाषणातून पत्रकार संघाचे कौतुक करत, लोकशाहीला अभिप्रेत असणारी संघटना असल्याचे गौरवोद्गार काढले.
नगराध्यक्ष पूजा गायकवाड यांच्यावतीने युवा नेते कुणाल गायकवाड यांनी उपस्थिती लावून आरोग्य शिबिराचे उद्घाटन केले. दीप प्रज्वलन आणि आचार्य बाळशास्त्री जांभेकर, आद्य संपादिका तानुबाई बिरजे यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करत बुलढाणा येथील पत्रकार भवनात कार्यक्रमाला सुरुवात झाली. प्रमुख उपस्थितीत अदिती अर्बनचे संस्थापक अध्यक्ष तथा दैनिक महाभूमीचे संपादक सुरेश देवकर, वैद्यकीय महाविद्यालयाचे वरिष्ठ अधिष्ठाता डॉ. कैलास झिने, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. दत्तात्रय बिराजदार, उद्योजक तथा सामाजिक कार्यकर्ता अमोल हिरोळे, डॉ. अर्चित हिरोळे हे होते. पत्रकार संघ, महिला सेलच्या मृणाल सावळे यांनी जिल्हा पत्रकार संघाच्या कामगिरीचा सखोल आढावा घेत प्रास्ताविक केले. शहराध्यक्ष राम हिंगे यांनी मान्यवर परिचय करून दिला. आरोग्य शिबिरासाठी योगदान देणाऱ्या डॉक्टरांचाही यावेळी सत्कार करण्यात आला. तदनंतर नवनिर्वाचित नगराध्यक्ष पूजा गायकवाड यांच्यावतीने कुणाल गायकवाड यांनी सत्कार स्वीकारला. पत्रकार ब्रह्मानंद जाधव यांनी मानपत्राचे वाचन केले. यावेळी आपले मनोगत व्यक्त करताना कुणाल गायकवाड यांनी सांगितले की, बुलढाणा विधानसभा मतदारसंघाचे आमदार संजय गायकवाड हे नेहमीच पत्रकारांच्या पाठीशी असतात. गत वेळी आरोग्य कार्ड काढून देत त्यांनी पत्रकारांच्या आरोग्याचा विचार केला असून, पत्रकारांचे आरोग्य सुदृढ असणे समाजासाठी गरजेचे असल्याचे ते म्हणाले. यानंतर सीएस बिराजदार, वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठता डॉ. झिने यांनीही आपले विचार मांडले. सूत्रसंचालन अभिषेक वरपे यांनी केले. तर, आभार प्रदर्शनातून जिल्हाध्यक्ष रणजीत सिंग राजपूत यांनी मी केवळ नाम मात्र असून, संपूर्ण जिल्हा पत्रकार संघाच्या टीमचे कार्य कौतुकास्पद असल्याचे सांगितले.
* पत्रकार कुटुंबीयांतील १०० जणांनी घेतला शिबिराचा लाभ :
आरोग्य शिबिरात हृदयरोग, दंतरोग, नेत्ररोग यासह ईसीजी चाचणी, शुगर यासह विविध तपासण्या करण्यात आल्या. उपस्थित डॉक्टरांनी मार्गदर्शन केले. जवळपास पत्रकार कुटुंबियातील १०० सदस्यांनी आरोग्य शिबिराचा लाभ घेतला. शिबिरासाठी डॉ. दीपक काटकर, डॉ. अभिलाष माळी, डॉ. प्रज्वल आंबेकर, डॉ. प्रफुल्ल जैस्वाल, डॉ. शैलेश वैष्णव, डॉ. मेहुल ठक्कर, डॉ. भट्टाचार्य, डॉ. सय्यद अर्शद, डॉ. साईनाथ तोडकर, मंगेश दलाल, नितीन श्रीवास्तव, हेमलता भीमनाडे, डॉ. प्रियंका राठोड, डॉ. धीरज जोशी, डॉ. निनाद पाटील यांनी परिश्रम घेतले.
* हिरोळे फाउंडेशनतर्फे पत्रकारांना ‘संविधान’ भेट
बुलढाणा शहरातील प्रसिद्ध उद्योजक तसेच सामाजिक कार्यकर्ते अमोल हिरोळे आणि डॉ. अर्चित हिरोळे यांनी पत्रकार बांधवांना संविधान प्रत भेट देऊन अभिनव सत्कार केला. सर्व पत्रकारांना पुष्पगुच्छ आणि शाल घालून त्यांनी आपुलकीने संवाद साधला. हिरोळे यांनी केलेल्या सत्कारामुळे पत्रकारांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले होते.
* रणजीतसिंग राजपूत ‘पत्रकारांचा आवाज’! : देवकर
पत्रकारिता हा व्यवसाय अत्यंत आव्हानात्मक आहे. पत्रकारिता टिकवून ठेवत असताना पत्रकार देखील सक्षम बनला पाहिजेत, हा विचार करणे काळाची गरज आहे. पत्रकार संघाचे जिल्हाध्यक्ष रणजीत राजपूत यांनी सुरुवातीपासूनच तळागाळातील पत्रकारांच्या हिताचा विचार केला, त्यामुळे ते पत्रकारांचा आवाज बनलेत, असे गौरवोद्गार सुरेश देवकर यांनी काढले.
