भारत विद्यालय वार्षिक क्रीडा स्पर्धाचे उदघाट्न* शालेय संस्कारांमुळे आज समाजात मानाचे स्थान मिळाले - आयर्नमॅन शरद राखोंडे


भारत विद्यालय वार्षिक क्रीडा स्पर्धाचे उदघाट्न
* शालेय संस्कारांमुळे आज समाजात मानाचे स्थान मिळाले - आयर्नमॅन शरद राखोंडे
बुलढाणा : (एशिया मंच न्यूज )
         आपल्या आयुष्यात दीर्घकाळ आपल्याला तंदुरुस्त राहायचे असेल तर विद्यार्थी जीवनामध्ये अभ्यासा सोबत मैदानी खेळांना खूप महत्वाचे स्थान दिले पाहिजे. शालेय जीवनामध्ये खेळ, क्रीडा व सुसंस्कारांमुळे आपल्याला आज समाजात मानाचे स्थान मिळाले आहे. तर एकीकडे आजच्या आधुनिक काळात मोबाईलच्या अतिरेकी वापरामुळे मैदाने ओस पडत असल्याची खंत भारत विद्यालयाचे माजी विद्यार्थी व आयर्नमॅन ॲडव्होकेट शरद राखोंडे यांनी भारत विद्यालयाच्या वार्षिक क्रीडा स्पर्धांच्या उद्घाटन प्रसंगी उद्घाटक म्हणून व्यक्त केली.
       सहा सात व आठ जानेवारी या तीन दिवसांसाठी भारत विद्यालयामध्ये वार्षिक क्रीडा स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेच्या उद्घाटन समारंभ प्रसंगी व्यासपीठावर शाळेचे मुख्याध्यापक प्रल्हाद गायकवाड, उपमुख्याध्यापक मोहन घोंगटे, पर्यवेक्षक नवल गवई यांची उपस्थिती होती. क्रीडा स्पर्धांचे उद्घाटन राज्यपातळीवर विविध खेळांमध्ये सहभागी झालेले विद्यार्थी व मान्यवरांच्या शुभहस्ते क्रीडा ज्योत प्रज्वलित करून करण्यात आले. तसेच 'हॉकी के जादूगर' ध्यानचंद यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. यावेळी शाळेचे मुख्याध्यापक प्रल्हाद गायकवाड यांनी खेळाडू तसेच पंचांना खिलाडूवृत्तीचे प्रदर्शन घडवत प्रामाणिकतेची शपथ दिली. याप्रसंगी केलेल्या मार्गदर्शनामध्ये हसा खेळा पण शिस्त पाळा असे आवाहन विद्यार्थ्यांना त्यांनी केले. पूर्वी प्रत्येक घरातील आई सायंकाळी आपल्या मुलांना मैदानावरून ओढून घरी नेत असे मात्र आज परिस्थिती उलट झाली असून आईला मुलांना मैदानावर ढकलावे लागत असल्याची वेळ आली आहे, असेही त्यांनी सांगितले. कार्यक्रमाच्या उद्घाटनासाठी प्रमुख पाहुणे म्हणून लाभलेले भारत विद्यालयाचे माजी विद्यार्थी ॲडव्होकेट शरद राखोंडे यांनी साऊथ कोरिया मध्ये आयोजित क्रीडा क्षेत्रातील सन्मानाचा आयर्नमॅन हा किताब प्राप्त केल्याबद्दल मान्यवरांच्या हस्ते शाल, श्रीफळ, सन्मानचिन्ह देऊन त्यांचा सत्कार करण्यात आला.
       या कार्यक्रमाचे प्रास्ताविक तथा पाहुण्यांचा परिचय शाळेतील शिक्षक डॉ. शिवशंकर गोरे यांनी केला. तसेच या कार्यक्रमाचे संचालन व आभार प्रदर्शन शिक्षक महेश चव्हाण यांनी केले. या कार्यक्रम प्रसंगी भारत विद्यालयातील विद्यार्थी व शिक्षकांची उपस्थिती होती.