शेख मुस्तफाच्या नेतृत्वात अमरावती विद्यापीठ संघ 'वेस्ट झोन'मध्ये प्रथम क्रमांक पटकावला

शेख मुस्तफाच्या नेतृत्वात अमरावती विद्यापीठ संघ 'वेस्ट झोन'मध्ये प्रथम क्रमांक पटकावला
बुलढाणा : (एशिया मंच न्यूज )
        गुजरातच्या बडोदा येथे पार पडलेल्या वेस्ट झोन आंतरविद्यापीठ फुटबॉल स्पर्धेत बुलढाणा येथील मुस्तफा शेख फिरोजच्या नेतृत्वात अमरावती विद्यापीठाने सर्व प्रतिस्पर्धी संघांना धूळ चारत प्रथम क्रमांक पटकावला. संघाच्या या घवघवीत यशामुळे त्यांची आता कोलकाता येथे होणाऱ्या 'ऑल इंडिया आंतरविद्यापीठ' स्पर्धेसाठी निवड झाली आहे. त्यामुळे क्रीडा क्षेत्रातील प्रतिभेसाठी ओळखल्या जाणाऱ्या मातृतीर्थ बुलढाणा जिल्ह्याच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा रोवला गेला आहे.

            आयपीएलच्या धर्तीवर चालणाऱ्या 'इंडियन सुपर लीग' (ISL) मधील मुंबई सिटी एफसी या व्यावसायिक फुटबॉल क्लबकडून शेख मुस्तफा हा सध्या राष्ट्रीय स्तरावर खेळत आहे. आपल्या खेळातील सातत्य आणि आक्रमक शैलीमुळे त्याने अल्पावधीतच फुटबॉल वर्तुळात आपली छाप सोडली आहे. त्याच्या या अनुभवाचा मोठा फायदा अमरावती विद्यापीठ संघाला वेस्ट झोन जिंकण्यासाठी झाला आहे. मुस्तफाच्या या यशामागे त्याला लाभलेले दर्जेदार मार्गदर्शन अत्यंत महत्त्वाचे ठरले असून त्याला राहुल भालेराव,  डॉ. किरण पवार यांचे
तांत्रिक मार्गदर्शन लाभले. मुस्तफाचे वडील स्वतः शेख फिरोज हे बुलढाणा पोलीस दलात पोलीस अंमलदार म्हणून कार्यरत असून बुलढाण्यातील वरिष्ठ फुटबॉल खेळाडूंनी त्याला वेळोवेळी प्रोत्साहित केले आहे.

        बुलढाणा शहर व अमरावती विद्यापीठाचे नाव राष्ट्रीय स्तरावर उज्ज्वल केल्याबद्दल मुस्तफाचे सर्वत्र कौतुक होत असून तो बुलढाण्यात परतल्यानंतर त्याच्या जंगी सत्काराचे नियोजन देखील करण्यात आले आहे. त्याच्या या विजयाबद्दल बुलढाण्यातील फुटबॉल प्रेमी मुकेश बाफना, वानखेडे, पोलीस अंमलदार अताउल्लाह खान, रमीज चौधरी, शहबाज यांच्यासह आदी  इतर ज्येष्ठ खेळाडूंनी त्याचे अभिनंदन केले आहे.