* केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधव यांच्या प्रयत्नांमुळे कुटुंबियांना मृतदेह आणण्यास मदत
बुलढाणा : (एशिया मंच न्यूज )
नेपाळमधील काठमांडू येथे हृदयविकाराच्या झटक्याने निधन पावलेल्या नांदेड येथील माधव कल्याणकर यांचा मृतदेह केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांच्या प्रयत्नांमुळे कुटुंबियांना मूळगावी आणण्यास मदत झाली. नेपाळ दुतावासासोबत संपर्क साधून मंत्री जाधव यांनी आवश्यक प्रक्रिया पूर्ण केली. तसेच काठमांडू ते नांदेड १९५० किमी अंतर मृतदेह आणण्यासाठी मोफत रुग्णवाहिका सुद्धा उपलब्ध केली.
नांदेड येथील माधवराव कृष्णराव कल्याणकर हे नेपाळमधील काठमांडू येथे गेले होते. १५ जानेवारीच्या रात्री त्यांना हृदयविकाराचा तीव्र झटका आला. यामध्ये त्यांचा मृत्यू झाला. दरम्यान कल्याणकर यांच्या कुटुंबीयांनी केंद्रीय आरोग्य व कुटुंब कल्याण राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांच्याशी रात्री बारा वाजता संपर्क साधला. मंत्री महोदयांनी विलंब न लावता प्रधानमंत्री कार्यालय आणि भारतातील नेपाळ दुतावासासोबत संपर्क साधला. त्यानंतर भारतीय दुतावासाच्या माध्यमातून संपर्क साधण्यात आला. केंद्रीयमंत्री प्रतापराव जाधव यांच्या टीमने रात्रभर संपर्क साधून सर्व प्रक्रिया पूर्ण केली. त्यानंतर मृतक माधवराव कृष्णराव कल्याणकर यांचा मृतदेह शव विच्छेदन न करता १६ जानेवारीच्या दुपारी तीन वाजता मृतदेह त्यांच्या नातेवाईंच्या ताब्यात देण्यात आला. काठमांडू ते नांदेड (१९५०किमी)पर्यत येण्यासाठी मोफत ॲम्बुलन्सची सोय उपलब्ध करून दिली.
