बुलढाणा अर्बन पतसंस्था बंद पडण्याच्या अफवा: नागरिकांची शाखांमध्ये गर्दी
* संस्थापक अध्यक्ष राधेश्याम चांडक यांचे स्पष्टीकरण
बुलढाणा : (एशिया मंच न्यूज )
गेल्या काही दिवसांपासून बुलढाणा अर्बन को-ऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी संकटात असल्याच्या वावड्या उठवल्या जात आहेत. या पार्श्वभूमीवर, संस्थेचे संस्थापक अध्यक्ष राधेश्याम चांडक यांनी समोर येत या सर्व अफवांचे खंडन केले असून संस्थेची आर्थिक स्थिती अत्यंत भक्कम असल्याचे स्पष्ट केले आहे.
आशिया खंडातील सर्वात मोठ्या सहकारी पतसंस्थांपैकी एक म्हणून नावलौकिक असलेल्या बुलढाणा अर्बन बाबत मराठवाड्यात पसरत असलेल्या अफवांमुळे नागरिकांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. याआधीही अनेक सहकारी क्रेडिट सोसायटीत ठेवीदारांचे पैसे अडकले आहेत. त्यात आता बुलढाणा सोसायटीबाबत अफवा उडाल्याने बीड आणि वडवणी सारख्या भागांत नागरिक पहाटेपर्यंत बँकांबाहेर रांगा लावून आपल्या ठेवी काढण्यासाठी गर्दी करत असल्याचे चित्र पाहायला मिळाले. मात्र, या अफवांना कोणताही कायदेशीर किंवा आर्थिक आधार नसून ठेवीदारांनी घाबरून जाऊ नये, असे आवाहन संस्थेचे संस्थापक अध्यक्ष राधेश्याम चांडक यांनी केले आहे
* नेमके काय म्हणाले राधेश्याम चांडक ?
राधेश्याम चांडक यांनी सांगितले की, बुलढाणा अर्बनची आर्थिक स्थिती अत्यंत मजबूत असून संस्थेचे सर्व व्यवहार नियमित आणि सुरळीतपणे सुरू आहेत. आशिया खंडातील सर्वात मोठ्या सहकारी पतसंस्थांपैकी एक म्हणून ओळख असलेल्या बुलढाणा अर्बनकडे सध्या सुमारे 16 हजार कोटी रुपयांच्या ठेवी आहेत. याशिवाय संस्थेकडे जवळपास 4 हजार कोटी रुपयांची मालमत्ता असून सुमारे 5 हजार कोटी रुपयांचे सोने सुरक्षित स्वरूपात उपलब्ध आहे. त्यामुळे संस्थेच्या आर्थिक स्थैर्यावर प्रश्नचिन्ह उपस्थित होण्याचे कोणतेही कारण नाही, असे त्यांनी स्पष्ट केले.
* अफवांचे मूळः 'कर्नाटक' कनेक्शन?
संस्थेच्या प्रतिमेला तडा देण्याचा हा जाणीवपूर्वक प्रयत्न असल्याचे चांडक यांनी म्हटले आहे. कर्नाटकातील एका साखर कारखान्याला कर्ज देणे थांबवल्यानंतर काही हितसंबंधी घटकांकडून मुद्दाम अफवा पसरवल्या जात असल्याचा दावा चांडक यांनी केला. संस्थेची प्रतिमा मलीन करणे आणि ठेवीदारांमध्ये भीती निर्माण करणे हा या अफवांचा उद्देश असल्याचे त्यांनी म्हटले केले. मात्र बुलढाणा अर्बनचे आर्थिक नियोजन, गुंतवणूक धोरण आणि भक्कम मालमत्ता पाहता अशा अफवांचा संस्थेवर कोणताही परिणाम होणार नसल्याचा विश्वास राधेशाम चांडक यांनी व्यक्त केला.
* सर्व व्यवहार सुरळीत; घाबरू नका :
बुलढाणा अर्बनच्या सर्व शाखांमधील व्यवहार नियमितपणे आणि पारदर्शकपणे सुरू आहेत. बँकेच्या अधिकाऱ्यांनीही नागरिकांना शांत राहण्याचे आवाहन केले असून, अफवांवर विश्वास ठेवून धावपळ करू नका असे सांगितले आहे. संस्थेची दीर्घकालीन विश्वासार्हता आणि गुंतवणूक धोरण पाहता, अशा प्रकारच्या चुकीच्या माहितीचा संस्थेवर कोणताही परिणाम होणार नसल्याचा विश्वास प्रशासनाने व्यक्त केला आहे.
