ज्ञानगंगा अभयारण्यात वाघाची दमदार एंट्री


ज्ञानगंगा अभयारण्यात वाघाची दमदार एंट्री

* मध्य प्रदेशातील पेंच उद्यानातून आणला वाघ; जंगल संवर्धनाला मिळणार बळकटी
बुलढाणा : (एशिया मंच न्यूज )
       ज्ञानगंगा अभयारण्यात वाघाची एंट्री झाली आहे. जंगल संवर्धनाच्यादृष्टीने वनविभागाने उचललेले हे मोठे पाऊल मानले जात आहे. मध्य प्रदेशातील पेंच व्याघ्र प्रकल्पातून हा तीन वर्षीय वाघ आणण्यात आला आहे. 

        यवतमाळ जिल्ह्यातील पांढरकवडा वनक्षेत्रात २०२३ मध्ये हा 'PKT7CP-1' वाघ अवघ्या चार महिन्यांचा असताना सापडला होता. त्यानंतर त्याचे संगोपन पेंच व्याघ्र प्रकल्पात करण्यात आले. शनिवारी रात्री पेंचमधून विशेष वाहनाद्वारे सलग १५ तासांचा प्रवास करून या वाघाला ज्ञानगंगा अभयारण्यात आणण्यात आले. २०५ चौ.कि.मी. क्षेत्रात पसरलेले हे अभयारण्य साग आणि अंजन वृक्षांच्या हिरवाईने नटलेले आहे. येथे आधीच बिबट, अस्वल, तडस, नीलगाय आणि विविध प्रजातींच्या पक्ष्यांचे वास्तव्य आहे. वनाधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, या वाघाला तूर्त अभयारण्यातील बोरखेड-देव्हारी परिसरातील एका विस्तारित जाळीच्या बंदिस्त क्षेत्रात ठेवण्यात आले आहे. विशेष म्हणजे, नवीन वातावरणात आल्यानंतर अवघ्या चार तासांतच या वाघाने त्याच्यासाठी सोडलेल्या एका रेड्याची शिकार केली. यावरून हा वाघ येथील वातावरणाशी लवकरच जुळवून घेईल, असा विश्वास वनविभागाने व्यक्त केला आहे.