बुलढाणा : (एशिया मंच न्यूज )
जिल्हा परिषद प्राथमिक शाळा (साखळी बुद्रुक) येथील उपक्रमशील शिक्षिका तसेच उत्कृष्ट निवेदिका किरण वाघमारे यांची राज्यस्तरीय पुस्तक परीक्षण स्पर्धेसाठी निवड झाली आहे.
राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेच्या वतीने सद्यःस्थितीत राज्यभरातील शिक्षक व अधिकाऱ्यांसाठी ४३ प्रकारच्या स्पर्धा सुरु आहेत. त्यामध्ये २६ डिसेंबर रोजी जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था, बुलढाणाद्वारे विभागीय पुस्तक परीक्षण स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. विभागातील सर्व शासकीय, स्थानिक स्वराज्य संस्था, प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळांमधील शिक्षक, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी सदर स्पर्धेत सहभाग घेतला होता. या विभागीय पुस्तक परीक्षण स्पर्धा २०२५-२६ मध्ये जिल्हा परिषद प्राथमिक शाळा (साखळी बुद्रुक) येथील उपक्रमशील शिक्षिका तसेच उत्कृष्ट निवेदिका किरण वाघमारे यांनी मांडलेले विवेचन, भाषेचा ओघ आणि पुस्तकाचा सखोल अभ्यास पाहून परीक्षकांनी त्यांच्या निवडीवर शिक्कामोर्तब केले असुन त्यांना राज्यस्तरीय पुस्तक परीक्षण स्पर्धेसाठी पात्र ठरविले आहे.
