काँग्रेस मध्ये उपेक्षा तर शिवसेनेने हेरला गडी...* अखेर ... गुरुजी झाले नगरसेवक!

काँग्रेस मध्ये उपेक्षा तर शिवसेनेने हेरला गडी...
* अखेर ... गुरुजी झाले नगरसेवक!
बुलढाणा : (एशिया मंच न्यूज )
         बुलढाणा शहराचा वैचारिक चेहरा म्हणून कार्यरत प्रा. सुनील सपकाळ यांना नगरपालिकेत स्वीकृत सदस्य म्हणून स्थान देण्यात आले आहे. त्यांच्या निवडीमुळे वैचारिक जडणघडण असलेला नेता आता नगरपालिका सभागृहात असणार आहे. काँग्रेसमध्ये असताना प्रचंड क्षमता असूनही ते उपेक्षित राहिले. मात्र त्यांच्यातील नेतृत्व गुण हेरून आ.संजय गायकवाड यांनी शिवसेनेतर्फे त्यांना स्वीकृत नगरसेवक पदाची संधी दिली आहे. त्यांच्या निवडीने बुलढाणामध्ये अनेक घटकांमध्ये आनंद व्यक्त केला गेला.

           पार पडलेल्या नगरपालिका निवडणुकीमध्ये सुनील सपकाळ यांनी उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षातर्फे नगरसेवक पदाची निवडणूक लढवली. यापूर्वी ते काँग्रेसमध्ये जिल्हा सरचिटणीस पदावर कार्यरत होते. काँग्रेसमध्ये असताना जवळजवळ सर्वच उपक्रमांमध्ये त्यांचा सहभाग महत्वपूर्ण असायचा. निवडणुकीच्या वेळी काँग्रेसकडून तिकीट मिळणार नाही हे जवळपास निश्चित झाल्याने त्यांनी उबाठा शिवसेनेमध्ये प्रवेश केला होता. तर नुकताच त्यांनी शिंदे सेनेत प्रवेश करून राजकीय खळबळ उडून गेली होती. जेव्हा ते शिंदे सेनेत गेले तेव्हाच पुढे राजकीय समीकरणे नक्कीच बदलणार असे मानले जात होते. त्यानुसार आज स्वीकृत नगरसेवक पदासाठी त्यांचे नाव आल्याने बुलढाण्याच्या राजकारणात अनेकांना अनपेक्षित धक्का बसला आहे. शैक्षणिक क्षेत्रात त्यांनी काम केले, सामाजिक क्षेत्रात गेल्या 25 वर्षापासून ते कार्यरत आहे. दीर्घकाळ कार्य करूनही नगरसेवक पदाने त्यांना हुलकावणी दिली होती. परंतु त्यांच्यातील उर्मी त्यांना स्वस्त बसू देत नव्हती. हा गडी धर्मवीर आ. गायकवाड यांनी हेरला. विश्वास दर्शवीत त्यांना स्वीकृत नगरसेवक पदी स्थान दिले आहे. एक प्रकारे हिरा पारखण्याचे काम त्यांनी केले. बौद्धिक क्षमता असणारा नगरसेवक म्हणून सुनील सपकाळ नगरपालिकेमध्ये असने बुलढाणा शहराच्या सामाजिक जडणघडणीमध्ये महत्त्वाचे ठरणार आहे. न.पा.गटनेते कुणाल गायकवाड यांनी आज सुनील सपकाळ सह मोहन परहाड, उदय देशपांडे यांची नावे स्वीकृत साठी सादर केली.
        नगरपालिका सदस्य म्हणून त्यांची झालेली निवड ही अर्थातच संधी असून त्या संधीचे सोने प्रा.सपकाळ करू शकतात. तूर्त वैचारिक बैठक असणारा सक्रिय पदाधिकारी मिळाल्याने ही शिंदेसेनेसाठी देखील जमेची बाब आहे.