बुलढाणा : (एशिया मंच न्यूज )
सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त पुण्यात आयोजित दुसऱ्या आंतरराष्ट्रीय फुले फेस्टिवलमध्ये आद्य क्रांतिकारी स्त्रीवादी लेखिका ताराबाई शिंदे यांच्या नात आणि पुणे महानगरपालिकेच्या वैद्यकीय अधिकारी डॉ. कांचन किशोर शिंदे यांनी क्रांतीज्योती सावित्रीबाईंची वेशभूषा साकारत प्रभावी कविता सादरीकरण केले. त्यांच्या या सादरीकरणाने फेस्टिवलमधील उपस्थितांची मने जिंकली.
पुणे येथील एस. एम. जोशी सभागृहात दुसरा आंतरराष्ट्रीय फुले फेस्टिवल २०२६ मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येत आहे. देशभरातून कवी, साहित्यिक, अभ्यासक व फुलेप्रेमी या फेस्टिवलमध्ये सहभागी झाले असून सामाजिक, शैक्षणिक व सांस्कृतिक विचारमंथनाचे प्रभावी व्यासपीठ म्हणून हा महोत्सव विशेष ठरत आहे.
शनिवार ३ जानेवारी रोजी झालेल्या या फेस्टिवलमध्ये डॉ. कांचन किशोर शिंदे यांनी विशेष उपस्थिती नोंदवली. दुसऱ्या आंतरराष्ट्रीय फुले फेस्टिवलमध्ये त्या संमेलनाच्या अध्यक्षस्थानी होत्या. क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीचे औचित्य साधत डॉ. कांचन शिंदे यांनी सावित्रीबाई फुले यांची वेशभूषा साकारली.
कार्यक्रमाचे आयोजक भिडेवाडाकार कवी प्रा. शि. विजय वडवेराव यांच्याहस्ते डॉ. कांचन शिंदे यांचा सन्मानचिन्ह, भारताचे संविधान आणि सन्मानपत्र देऊन गौरव करण्यात आला. विशेष म्हणजे ज्या पुणे शहरातून ताराबाई शिंदे यांचे ऐतिहासिक 'स्त्री-पुरुष तुलना' हे ग्रंथप्रकाशन झाले, त्याच पुण्यात बुलढाणा जिल्ह्यातील लेकीचा सन्मान होत असल्याचा गौरवपूर्ण उल्लेख यावेळी करण्यात आला. फुले विचारांच्या प्रसारासाठी आयोजित या आंतरराष्ट्रीय फेस्टिवलमुळे नव्या पिढीला सामाजिक परिवर्तनाची दिशा मिळत असून समता, शिक्षण व न्यायाच्या मूल्यांची जाणीव अधिक दृढ होत असल्याचे मत उपस्थितांनी व्यक्त केले.
डॉ. कांचन शिंदे यांच्या प्रभावी सादरीकरणामुळे सभागृहात उपस्थित असलेल्या मान्यवरांसह प्रेक्षक भारावून गेले. तसेच यावेळी त्यांनी सावित्रीबाई फुले यांच्या जीवनकार्यावर आधारित कवितेचे भावपूर्ण सादरीकरण करत स्त्री शिक्षण आणि सामाजिक परिवर्तनासाठी त्यांनी दिलेल्या योगदानाबद्दल कृतज्ञता व्यक्त केली. वैद्यकीय सेवेसोबतच कला व साहित्य क्षेत्रातही डॉ. कांचन शिंदे यांची वाटचाल प्रेरणादायी असल्याचे मत अनेक वत्क्त्यांनी व्यक्त केले.
