बुलढाणा : (एशिया मंच न्यूज )
गेल्या अनेक दिवसांपासून गावात नियमित घंटागाडी येत नसल्याने कचऱ्याचे ढीग साचले आहेत. यामुळे त्रस्त झालेल्या युवकांनी आपल्या संतापला वाट मोकळी करून देत सदर कचरा थेट ग्रामपंचायत कार्यालयात नेऊन फेकला. त्यामुळे प्रशासकीय दिरंगाई आणि स्वच्छतेच्या प्रश्नाकडे होणारे दुर्लक्ष किती महागात पडू शकते, याचा प्रत्यय सुंदरखेड ग्रामपंचायतीला आला.
सुंदरखेड ग्रामपंचायत अंतर्गत स्वच्छतेचा प्रश्न गेल्या काही महिन्यांपासून गंभीर झाला आहे. ग्रामपंचायत प्रशासनाची घंटागाडी
वेळेवर येत नसल्याने, तसेच
सार्वजनिक ठिकाणांची साफसफाई
देखील रखडलेली असल्यामुळे
गावातील रस्त्यांच्या कडेला आणि
मोकळ्या भूखंडांवर कचऱ्याचे
साम्राज्य निर्माण झाले आहे. यामुळे
उपरोक्त परिसरात कमालीची
दुर्गंधी पसरली आहे. या घाणीमुळे
परिसरात मोठ्या प्रमाणात डासांचा
प्रादुर्भाव वाढल्याने नागरिकांच्या
आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर आला
आहे. गावातील तरुणांनी ग्रामपंचायत कार्यालय गाठून अनेकदा लेखी व तोंडी तक्रारी केल्या. मात्र, ग्रामपंचायत प्रशासनाकडून आश्वासनांचा पलीकडे काहीच करण्यात आले नाही. प्रशासनाच्या या ढिम्म कारभाराला कंटाळलेल्या तरुणांनी अखेर २१ जानेवारी रोजी चांगलाच
आक्रमक पवित्रा घेत साचलेला कचरा जमा करून ग्रामपंचायत कार्यालयात नेऊन टाकला. तरुणांनी अचानक केलेल्या या आंदोलनामुळे ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांची चांगलीच धावपळ उडाली. गावात ठिकठिकाणी घाणीचे साम्राज्य पसरले आहे. यामुळे लहान मुले आणि ज्येष्ठांचे आरोग्य धोक्यात आले आहे. डेंग्यू आणि मलेरिया सारख्या आजारांची भीती वाढली आहे. आम्ही कर भरतो, मग आम्हाला मूलभूत सुविधा का मिळत नाहीत?, असा सवाल आंदोलकांनी केला आहे. आजचे आंदोलन केवळ ही ट्रेलर होती, दोन-तीन दिवसांत घंटागाडी नियमित सुरू करुन गावातील कचरा उचलला गेला नाही, तर तीव्र आंदोलन छेडण्याचा इशाराही आंदोलकांनी दिला आहे.
