महिलांमध्ये निर्णय क्षमता असणे गरजेचे : राजश्री गायकवाड* सावित्रीमाई फुले जयंती; जिल्हा पत्रकार संघाचे आयोजन

महिलांमध्ये निर्णय क्षमता असणे गरजेचे : राजश्री गायकवाड
* सावित्रीमाई फुले जयंती; जिल्हा पत्रकार संघाचे आयोजन
बुलढाणा : (एशिया मंच न्यूज )
        शिक्षणापासून उपेक्षित असलेल्या मुलींना शिक्षण प्रवाहात आणून जगण्याचे बळ देण्याचे काम क्रांतिज्योति सावित्रीमाई फुले यांनी केले. अत्यंत कठीण परिस्थितीत, अनेक आव्हाने स्वीकारून स्त्री सक्षमीकरणाचा नारा दिला. त्यांच्यामुळे आज महिला सर्वच क्षेत्रात प्रतिनिधित्व करीत असून, आपली ताकद दाखवून देत आहेत, असे असतानाही आजही अनेकदा महिलांचे प्रतिनिधित्व केवळ नावापूरते ठरत आहे. त्यांच्यामागे घरातील पुरुष सदस्य सगळा कारभार बघतात. यामुळे, महिलांमध्ये निर्णय क्षमता असणे गरजेचे आहे, असे प्रतिपादन राजश्री सचिन गायकवाड यांनी केले. 

          स्त्री शिक्षणाचा जगन्माता क्रांतीज्योती सावित्रीमाई फुले यांच्या जयंतीनिमित्त बुलढाणा जिल्हा पत्रकार संघांतर्गत बुलढाणा पत्रकार भवन येथे राजश्री सचिन गायकवाड यांच्या व्याखानाचे आयोजन 3 जानेवारी रोजी करण्यात आले होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संपादिका सुरेखाताई सावळे, प्रमुख उपस्थितीत नगरसेविका देवांगणाताई ठाकरे, डॉ. अभिलाष माळी उपस्थित होते. सावित्रीमाई फुले यांच्या प्रतिमेला हार अर्पण करीत कार्यक्रमाला सुरुवात झाली. पत्रकार गणेश निकम यांनी आयोजनाचा मागची भूमिका स्पष्ट करताना सांगितले की, जिल्हा पत्रकार संघाचे अध्यक्ष रणजीतसिंग राजपूत यांच्या मार्गदर्शनाखाली पत्रकार संघ अनेक नावीन्यपूर्ण उपक्रम राबवित आहे. महापुरुषांच्या जयंती उत्सव कार्यक्रमाद्वारे पत्रकारांना वैचारिक ऊर्जा मिळत असल्याचे ते म्हणाले. यानंतर, देवांगणाताई ठाकरे यांनी आपल्या मनोगतातून सांगितले की, सावित्रीमाई फुले यांनी ज्या आव्हांनाचा सामना केला, त्याची कल्पना आपण करू शकत नाही. इतिहासावर प्रकाश टाकत त्या म्हणाल्या, समाजातील अनिष्ठ परंपरा झुगारून, ‘चूल आणि मूल’ इतक्यापुरता मर्यादित असलेल्या काळात सावित्रीमाईंनी परिवर्तनाचे दीप प्रज्वलित केले. त्यांच्यामुळेच ज्ञानाचा प्रकाश सर्वदूर पसरला आहे. सुरेखाताई सावळे यांनीही आपले विचार मांडले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन पत्रकार संघाचे प्रदेश प्रतिनिधी युवराज वाघ यांनी केले. आभार अभिषेक वरपे यांनी मानले. याकार्यक्रमासाठी मोठ्या संख्येने पत्रकार तथा विविध क्षेत्रात कार्यरत असणारे शहरातील नागरिक उपस्थित होते.

* महिलांच्या अभिव्यक्ती स्वातंत्र्याचे महत्व अधोरेखित : 
          डॉ. अभिलाष माळी यांनी तत्कालीन परिस्थिती मांडत आजही अनेक ठिकाणी रूढी, परंपरा कायम असल्याची खंत व्यक्त केली. पुढे बोलताना ते म्हणाले, संत आणि महापुरुषांच्या विचारांचा आदर्श घेऊन आपण जगाची वास्तविकता स्वीकारली पाहिजेत, इतरांना हेवा वाटावा असे आपले जीवन असावे, आणि हे केवळ मानसिकतेत परिवर्तन झाल्यावरच होईल, असे परखड मत मांडले. सावित्रीबाई फुले आणि महात्मा ज्योतिराव फुले यांनी आव्हानात्मक काळात क्रांतीचा नारा दिला. परिणामी, स्त्री वर्गात अभिव्यक्ती स्वातंत्र्याचे महत्त्व अधोरेखित झाले.