जिजाऊ जन्मोत्सव सोहळ्यानिमित्त जिल्हाधिकाऱ्यांची "मेगा" बैठक* मराठा सेवा संघ दिनदर्शिकेचे मान्यवरांच्या हस्ते प्रकाशन

जिजाऊ जन्मोत्सव सोहळ्यानिमित्त जिल्हाधिकाऱ्यांची "मेगा" बैठक
* मराठा सेवा संघ दिनदर्शिकेचे मान्यवरांच्या हस्ते प्रकाशन 

बुलढाणा : (एशिया मंच न्यूज )
         जगभरातील जिजाऊ भक्तांच्या मांदियाळीने मातृतीर्थ सिंदखेड राजा नगरी 12 जानेवारी रोजी दुमदुमून जाते. जिजाऊ जन्मोत्सव हा लोकोत्सव झाला आहे.जिजाऊ जन्मोत्सव नजीक आहे या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकाऱ्यांनी जिल्हा पोलीस अधीक्षक, जिल्हा परिषद सिइओ व सर्व खाते प्रमुख अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत मेगा बैठक घेतली. यावेळी मराठा सेवा संघाचे पदाधिकारी उपस्थित होते. प्रसंगी मराठा सेवा संघाने प्रकाशित केलेल्या शिवधर्म दिनदर्शिकेचे प्रकाशन जिल्हाधिकाऱ्यांच्या हस्ते करण्यात आले. 

        एकच वारी 12 जानेवारी म्हणत जगभरातील जिजाऊ भक्त 12 जानेवारीला सिंदखेड राजा मध्ये जिजाऊ चरणी नतमस्तक होण्यासाठी हजेरी लावतात. मातृतीर्थाची धूळ माथी लावण्यासाठी जगभरातील लाखोंची उपस्थिती या ठिकाणी होत असल्याने अर्थातच प्रशासनावरही मोठा ताण येतो. जिजाऊ भक्तांची व्यवस्था चोख होण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांनी आज खाते प्रमुखांच्या उपस्थितीत मेगा बैठक घेतली. अधिकाऱ्यांना सूचना केल्या. मराठा सेवा संघाचे पदाधिकारी यांनी वेगवेगळ्या सूचना जिल्हाधिकाऱ्यांच्या समोर मांडल्या, अधिकाऱ्यांच्या समक्ष यावर चर्चा व निराकरण करण्यात आले. प्रशासनाकडून सर्व ते सहकार्य करण्याचे जिल्हाधिकाऱ्यांनी यावेळी आश्वासित केले. 
          12 जानेवारी रोजी दरवर्षी मराठा सेवा संघातर्फे दिनदर्शिका प्रकाशित करण्यात येते. यावर्षी कॉम्रेड शरद पाटील हा विषय निवडला आहे. सदर दिनदर्शिकामध्ये कॉम्रेड शरद पाटलांचे विचार आणि लेख छापलेले असून इतिहास प्रेमी तथा इतिहास अभ्यासक व शालेय विद्यार्थ्यांना ही दिनदर्शिका संग्रही ठेवण्यालायक आहे. दिनदर्शिकेचे लिखाण संयोजन मराठा सेवा संघाचे कार्यकर्ते अभय पाटील, जिजाऊ सृष्टीचे व्यवस्थापकीय संचालक शिवश्री सुभाष कोल्हे ,मराठा सेवा संघाचे बुलढाणा जिल्हा अध्यक्ष रवींद्र चेके, डॉ.मनोहर तुपकर यांनी केले आहे. हे वर्ष कॉ.शरद पाटील जन्मशताब्दी वर्ष आहे. कॉ.शरद पाटील हे जागतिक कीर्तीचे थोर  विद्यापंडित, दार्शनिक, विचारवंत, सौत्रांतिक मार्क्सवाद व अब्राह्मणी सौंदर्यशास्त्राचे जनक होते. ते जातवर्गस्त्रीदास्य लढ्याचे मुकुटमणी आहेत. त्यांनी सौत्रांतिक मार्क्सवादी तत्वज्ञान व बहूप्रवाही ऐतिहासिक भौतिकवादी अन्वेषण पद्धत शोधून काढली. मार्क्सवादाला फुले आंबेडकरवादाची जोड देण्याचे ऐतिहासिक कार्य त्यांनी केले.याची मांडणी दिनदर्शिकेत आहे.
          या सभेला जिल्हाधिकारी किरण पाटील, गुलाबराव खरात
मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद बुलढाणा, निलेश तांबे जिल्हा पोलीस अधीक्षक बुलढाणा, आदित्यसिंह IPS, सुरेश कव्हळे अप्पर जिल्हाधिकारी बुलढाणा, मनीषा कदम उपविभागीय
पोलीस अधिकारी सिंदखेड राजा, प्रा. संजय खडसे उपविभागीय अधिकारी सिंदखेडराजा, जितेंद्र काळे
कार्यकारी अभियंता सामाजिक बांधकाम विभाग बुलढाणा, आशिष बोबडे सीईओ नगरपरिषद
सिंदखेडराजा, आयोजन समितीचे डॉ. मनोहर तुपकर राज्य संघटक, सुभाषराव कोल्हे सचिव, रविंद्र चेके
जिल्हाध्यक्ष मराठा सेवा संघ, योगेश पाटील राज्य संघटक, पांडुरंग पाटील संभाजी ब्रिगेड, ज्योतीताई राजे
जाधव, रविकांत काळवाघे, विष्णू म्हसागर, संजय विखे, विवेक काळे, अशोकराव ढोणे, अभय पाटील, इंजी.रविकांत कालवाघे, वैराळ आदी
उपस्थित होते.