* येत्या 15 एप्रिल 2026 ला भव्य करवंड महोत्सव
बुलढाणा : (एशिया मंच न्यूज )
‘बावन बुरजी (करवंड)बचाव कृती समिती’मागील एक वर्षापासून स्थापन झाली आहे. बुलढाणा जिल्ह्यातील चिखली तालुक्यातील करवंड हे गाव छत्रपती शिवाजी महाराजांच्या अष्टम पत्नी महाराणी गुणवंताबाई यांचे माहेर म्हणून ऐतिहासिकदृष्ट्या अत्यंत महत्त्वाचे आहे. या गावातील बावन बुरजी (गढी) हा वारसा आजही त्या इतिहासाची साक्ष देतो. मात्र प्रशासनाकडून आणि समाजाकडून योग्य संवर्धन न झाल्यामुळे हा अमूल्य वारसा हळूहळू दुर्लक्षित होत आहे.
या पार्श्वभूमीवर गावकरी, इतिहासप्रेमी, सामाजिक कार्यकर्ते व तरुणांनी एकत्र येत लोकचळवळीच्या स्वरूपात अधिक सह्यांची मोहीम सुरू केली असून या चळवळीला अधिक औपचारिक आणि संघटित रूप देण्यासाठी “बावन बुरजी (करवंड) बचाव कृती समिती” या समितीची स्थापना करण्यात आली आहे.
या समितीच्या माध्यमातून पुढील बावनबुरजी संवर्धन व विविध उपक्रम राबविण्यात येणार आहे.
बावन बुरजी व परिसराचे तातडीने संरक्षण व संवर्धन पुरातत्त्व विभागाकडून अधिकृत नोंद व अभ्यास
ऐतिहासिक वारसा स्थळ म्हणून विकास आराखडा तयार करणे,
शैक्षणिक, सांस्कृतिक व पर्यटनाच्या दृष्टीने या स्थळाचा प्रचार-प्रसार
पुढील पिढीपर्यंत इतिहास पोहोचवण्यासाठी जनजागृती उपक्रम,
ही केवळ एका गावाची नव्हे, तर महाराष्ट्राच्या ऐतिहासिक अस्मितेची लढाई आहे. त्यामुळे नागरिक, अभ्यासक, संघटना व लोकप्रतिनिधींनी या उपक्रमात सहभागी होऊन सहकार्य करावे, असे आवाहन बावन बुरजी (करवंड) बचाव कृती समितीच्या वतीने करण्यात आले आहे. येत्या 15 एप्रिल 2026 पासून करवंड महोत्सवास सुरुवात होत आहे. या महोत्सवाच्या तयारीच्या अनुषंगाने येत्या 4 जानेवारी 2026 ला रविवारी करवंड येथे बावनबुरची बचाव कृती समितीची बैठक हरी रुद्र राजे इंगळे यांच्या निवासस्थानी दोन वाजता आयोजित आहे. शिवप्रेमींनी जास्तीत जास्त संख्येने बैठकीस करवंडला उपस्थित राहावे, असे आवाहन बावनबुरजी बचाव कृती समितीच्या वतीने करण्यात आलेले आहे, असे संकल्पक सुनील जवंजाळ पाटिल यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे.
