* राजस्थानातील बॉर्डर अल्ट्रा मॅरेथॉनमध्ये धावपटू संतोष जाधवांची गौरवास्पद कामगिरी
बुलढाणा : (एशिया मंच न्यूज )
देशातील १२०० स्पर्धक सहभाग झालेल्या राजस्थानमधील जैसलमेर ते लोंगेवाला बॉर्डर अल्ट्रा मॅरेथॉनचे १०० किमीचे अंतर वेळेत पूर्ण करुन बुलढाण्याचा धावपटू लेक संतोष जाधव हजारात एक ठरला.
जैसलमेर ते लोंगेवाला बॉर्डर अल्ट्रा मॅरेथॉन ही स्पर्धा ६ डिसेंबर रोजी झाली. ही स्पर्धा ५० कि.मी., १०० कि.मी. व १६० कि.मी. गटात घेण्यात आली. 'दी हेल रेस' या संस्थेद्वारे २०१८ पासून ही मॅरेथॉन आयोजित करण्यात येते. १९७१ च्या भारत-पाक युद्धात लोंगेवाला बॉर्डरवर तैनात पंजाब रेजिमेंटच्या २३ व्या बटालियनमधील केवळ १२० सैनिकांनी पाकच्या हजारो सैनिकांना संपूर्ण रात्रभर रोखून ठेवले होते. नंतर भारतीय हवाई दल व इतर कुमक दाखल झाली. शहीद भारतीय जवानांच्या स्मरणार्थ ही मॅरेथॉन आयोजित करण्यात येते. बुलढाण्याचे संतोष जाधव यांनी १०० कि.मी. मॅराथॉन १३ तास १५ मिनिट ४६ सेकंदात यशस्वीपणे पूर्ण करून देशात बुलढाण्याची मान उंचावली. या स्पर्धेत १०० कि.मी. चे अंतर १६ तासात पूर्ण करणे व १६० किमी अंतर २८ तासात पूर्ण करणे अनिवार्य होते. राजस्थानच्या कठीण अशा स्पर्धेत सहभाग घेवून ती स्पर्धा यशस्वीपणे पूर्ण करण्याची कामगिरी बुलढाण्यातून संतोष जाधव यांनाच करता आली. त्यांनी दक्षिण आफ्रिकेतील ९० कि.मी. कॉम्रेड मॅराथॉनमध्ये सुद्धा आपल्या यशाचा झेंडा फडकावला आहे.
