* कमी पटसंख्येच्या बहाण्याने शाळा बंद करण्याच्या युती शासनाच्या धोरणाची लोकनेत्या जयश्रीताई शेळकेंनी केली चिरफाड
बुलढाणा : (एशिया मंच न्यूज )
कमी पटसंख्या हा बहाना करून युती सरकारने हजारो शाळा बंद केल्या. त्याचा सर्वात मोठा फटका मुलींच्या शिक्षणाला बसला. केंद्राच्या अहवालानुसार राज्यातील १५ हजार ३५७ मुली शिक्षणापासून दूर झाल्या आहेत. तरी सरकारने याबाबत आत्मपरिक्षण केले नाही तसेच जबाबदारी सुद्धा घेतली नाही. खर्चाची वजाबाकी कराल पण मुलींचे हरविलेले शिक्षण आणि संधी परत देण्याची क्षमता आहे का? असा सवाल उपस्थित करीत शिवसेना (उबाठा) राज्य प्रवक्ता जयश्रीताई शेळके यांनी शासनाच्या धोरणाची चिरफाड केली.
संचमान्यतेचे निकष, कमी पटाच्या शाळा बंद करण्याचा घाट याचा राज्यातील मुलींच्या शिक्षणावर मोठ्या प्रमाणात परिणाम होत असल्याचे दिसते आहे. शुल्क माफीपासून प्रवास भत्त्वयापर्यंत अनेक योजना राबवूनही यंदा राज्यातील १५ हजार ३५७ किशोरवयीन मुली शिक्षण प्रवाहाबाहेर असल्याचे केंद्र शासनाने जाहीर केलेल्या आकडेवारीवरून उघड झाले आहे. राज्यातील बालविवाहांची कुप्रथा आणि घराजवळ शाळा नसल्याने मुलींचे शिक्षण थांबत आहे. गेल्या काही वर्षांपासून राज्यातील शाळाबाह्य विद्यार्थ्यांची संख्यात्मक नोंद कमी झाल्याचे दिसत असले तरीही राज्यातील हजारो विद्यार्थी शाळाबाह्य असल्याचे दिसते आहे. केंद्र शासनाच्या महिला आणि बालकल्याण विभागाने जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार राज्यात यंदा (२०२५-२६) १५ हजार ३५७ किशोरवयीन मुली शाळाबाह्य असल्याचे दिसते आहे, तर एकूण राज्यात यंदा ३० हजार ७१४ शाळाबाह्य मुले-मुली आढळली आहेत. आढळलेल्या मुलांपैकी किती मुलांना शाळेत दाखल करण्यात आले याची राज्यातील नोंद मात्र उपलब्ध नाही. शाळा लांब असल्यास फटका राज्यातील कमी पटाच्या शाळा बंद करण्याचा प्रयत्न शासनाकडून गेली अनेक वर्षे करण्यात येत आहे. शाळा बंद झाल्यामुळे अनेक गावांमध्ये, मुलांच्या घरांजवळ शाळा नाहीत. शाळा बंद करण्याचा फटका मुलींच्या शिक्षणाला अधिक बसत असल्याचे निरीक्षण शिक्षकांनी नोंदवले आहे. शाळा दूर असेल तर शासन प्रवास खर्च देते. मुलींना प्रवास भत्ता मिळतो, शुल्क माफ असते. मात्र, दूरच्या शाळेत पाठवणे विशेषत मुलींना दूर पाठवणे अनेक ठिकाणी पालकांना सुरक्षित वाटत नाही. गावामध्ये किंवा परिसरात मुलींच्या छेडछाडीचा किंवा अत्याचाराची एखादी घटना घडली तरी शाळेतील मुलींची उपस्थिती घटते, असे जिल्हा परिषदेच्या एका शिक्षकांनी सांगितले. त्याशिवाय बालविवाह, माध्यमिक शाळांचे वर्ग जोडलेले नसणे याही बाबी मुली शिक्षणाच्या प्रवाहाबाहेर पडण्यास कारणीभूत ठरत आहेत.
