* एसटीच्या ताफ्यात १२ बसेस दाखल ; पर्यावरणपूरक अन आरामदायी प्रवासाला मिळणार गती
बुलढाणा : (एशिया मंच न्यूज )
जिल्हावासीयांची ईव्ही बसची प्रतीक्षा अखेर संपली असून एसटीच्या ताफ्यात पहिल्या टप्प्यात १२ बसेस दाखल झाल्या आहेत. या बसेस लवकरच ग्रामीण आणि शहरी भागांत धावणार आहेत.
जिल्ह्यात ईव्ही एसटी बस कधी येणार याबाबत सर्वांना आतुरता लागली होती. अखेर ईव्ही बसेस दाखल झाल्या आहेत. जिल्ह्याला एकूण १५० बसेस मिळणार असून त्यापैकी १२ बस दाखल झाल्याची माहिती सूत्रांनी दिली. ईव्ही बस म्हणजे महाराष्ट्राच्या सार्वजनिक वाहतुकीत आलेले एक आधुनिक आणि पर्यावरणास अनुकूल पाऊल आहे. या बसेस शून्य उत्सर्जन करतात, ज्यामुळे हवेची गुणवत्ता सुधारते. बस इलेक्ट्रिक असल्याने यांचा आवाज कमी असतो आणि प्रवास आरामदायी होतो.
डिझेल बसेसच्या तुलनेत चालवण्याचा खर्च कमी असल्याने प्रवाशांना फायदा होतो. ईव्ही बसेस फास्ट चार्जिंगने काही तासांत चार्ज होतात. एकदा चार्ज केल्यावर दीडशे ते अडीचशे किमीपर्यंत धावू शकतात. जिल्ह्यातील प्रवाशांमध्ये ईव्ही बसेसबाबत उत्सुकता होती. ती आता संपली असून नव्या बसेसमधून प्रवास करायला नागरिकांना नक्कीच आवडेल.
