* प्रेमप्रकरणातून उचलले टोकाचे पाऊल; केळवद येथील घटना
बुलढाणा : (एशिया मंच न्यूज )
गळफास घेऊन एका २० वर्षीय तरुणीने आत्महत्या केल्याची घटना २४ जानेवारी रोजी सकाळी चिखली तालुक्यातील केळवद येथे घडली. प्रेमप्रकरणातून युवतीने टोकाचे पाऊल उचलले असून आरोपी तरुणाविरुद्ध चिखली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार तन्मय विजय गवई याने २० वर्षीय तरुणीस प्रेमाच्या जाळ्यात ओढले. उन्हाळ्यात लग्न करण्याचे आमिष दाखवत विश्वास संपादन केला. सतत फोनवर बोलणे, भेटीगाठी आणि लग्नाची स्वप्ने दाखवून तरुणीला मानसिकदृष्ट्या गुंतवून ठेवले होते. मात्र २४ जानेवारी रोजी सकाळच्या सुमारास आरोपीने अचानक फोन करून लग्नास स्पष्ट नकार दिला. या धक्क्याने पूर्णपणे खचलेल्या तरुणीने राहत्या घरी साडीच्या साहाय्याने गळफास घेत आत्महत्या केली. हा प्रकार आत्महत्या नसून, मानसिक छळातून घडवलेला गंभीर गुन्हा असल्याचा आरोप मयत तरुणीच्या कुटुंबीयांनी केला.
तरुणीच्या वडिलांच्या तक्रारीवरून आरोपीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपीने दिलेल्या खोट्या आश्वासनांमुळेच तरुणीने टोकाचे पाऊल उचलल्याचे स्पष्ट होत आहे. प्रेमाच्या नावाखाली तरुणीच्या भावनांचा खेळ करणाऱ्यास कठोर शिक्षा होणार का? असा सवाल उपस्थित होत असून आरोपीला तात्काळ अटक करून कठोर कारवाईची मागणी होत आहे. पुढील तपास चिखलीचे ठाणेदार भूषण गावंडे यांच्या मार्गदर्शनाखाली बीट जमादार अनिल वाघ करीत आहेत.
