शेतकऱ्यांनी भविष्यातील फसगत टाळावी
* मार्केट यार्डमध्ये शेतमाल विकावा : जालिंदर बुधवत
बुलढाणा : (एशिया मंच न्यूज )
मोठे काबाडकष्ट करून पिकवलेला शेतमाल हा विकताना फजगत टाळण्याची खबरदारी घ्यावी. मार्केट यार्ड मध्येच शेतमाल विकावा, असे आवाहन कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती बुधवत जालिंदर यांनी केले आहे.
निसर्गाच्या संकटाशी दोन हात करत शेतकरी बांधव शेती करतात. त्यातून काबाडकष्ट करत शेतीचे उत्पादन काढतात. कधी पदरमोड करून तर कधी बँकांचे कर्ज घेऊन शेतीचा व्यवसाय करावा लागतो. मात्र, अलीकडे अनोळखी व्यापाऱ्यांना शेतमाल देऊन फसवणूक झाल्याच्या किंवा वजन काट्यामध्ये तफावत होत असल्याच्या अनेक तक्रारी आमच्याकडे प्राप्त होत आहेत. अनेक व्यापारी खेडा खरेदी करतात. मात्र, शेतकऱ्यांना आज- उद्या मोबदला देऊ म्हणून वेळ काढून पळ काढतात. कुठलीही बाजार चिठ्ठी त्यांच्याकडे नसते, त्यामुळे कारवाई होत नाही.
शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान मोठ्या प्रमाणात होते. त्यामुळे भविष्यातील संकट टाळण्यासाठी बाजार समितीच्या अधिकृत मार्केट यार्डमध्ये आणि परवानाधारक असलेल्या व्यापाऱ्यांकडेच आपला शेतमाल शेतकऱ्यांनी देऊन त्याचा मोबदला तत्काळ घ्यावा आणि आपले नुकसान व फसगत टाळावी, असे आवाहन बाजार समितीचे सभापती जालिंदर बुधवत तसेच सचिव व समस्त संचालक मंडळ यांनी केले आहे. महत्वाचे म्हणजे शेतकऱ्यांनी बुलढाणा व उपबाजार धाड मार्केट यार्डवर आपला शेतमाल विक्रीसाठी आणावा आणि काही तक्रारी असल्यास बाजार समिती कार्यालयात संपर्क साधावा असेही यावेळी सांगण्यात आले आहे.
