अल्पवयीन ११ वर्षीय मुलीवर बलात्कार
* पोक्सोअंतर्गत गुन्हा दाखल
दुसरबीड : (एशिया मंच न्यूज )
अकरावर्षीय मुलीवर शेजारी राहणाऱ्या दोन अल्पवयीन मुलांनी बलात्कार केल्याची घटना किनगाव राजा पोलीस स्टेशन हद्दीतील एका गावात घडली. या प्रकरणी दोन्ही मुलांवर बलात्कार व पोक्सो कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पीडित अल्पवयीन मुलगी २३ डिसेंबर रोजी दुपारी दोन वाजेच्या सुमारास घरात एकटीच होती. यावेळी शेजारी राहणारे दोन अल्पवयीन मुले तिच्या घरी गेले. १५ वर्षीय आरोपीने घराबाहेर लक्ष ठेवले, तर १४ वर्षीय दुसऱ्या आरोपीने पीडित मुलीवर बलात्कार केला. घटनेनंतर पीडित मुलीने आपल्याला शारीरिक वेदना होत असल्याची माहिती कुटुंबीयांना दिल्यानंतर हा प्रकार उघड झाला.
दरम्यान, पीडित मुलीच्या आईच्या तक्रारीवरून घटनेच्या दुसऱ्या दिवशी किनगाव राजा पोलीस ठाण्यात तक्रार दिली. या प्रकरणी पोलिसांनी भारतीय न्याय संहितेच्या विविध कलमांतर्गत तसेच पोक्सो कायदा कलम ४, ६ व १७ अन्वये गुन्हे नोंदविण्यात आले. या प्रकरणात प्राथमिक साक्ष नोंदविण्यात आली. घटनेचा अधिक तपास ठाणेदार संजय मातोंडकर करीत आहेत. या घटनेमुळे सिंदखेड राजा तालुक्यात खळबळ उडाली आहे. या घटनेनंतर अल्पवयीन मुलींच्या सुरक्षिततेबाबत गंभीर चिंता व्यक्त केली जात आहे.
