* ऐतिहासिक बुलढाणा जिल्ह्यात भव्य स्वरूपात संपन्न होणार
बुलढाणा : (एशिया मंच न्यूज )
पत्रकारांच्या हक्कांसाठी, न्यायासाठी आणि स्वाभिमानासाठी सातत्याने संघर्ष करणाऱ्या राष्ट्रीय पुरोगामी पत्रकार संघाचा आठवा वर्धापन दिन मंगळवार 30 डिसेंबर 2025 रोजी ऐतिहासिक बुलढाणा जिल्ह्यात मोठ्या उत्साहात संपन्न होणार आहे. हा वर्धापन दिन सोहळा राज्याध्यक्ष विष्णू कंकाळ यांच्या नेतृत्वाखाली आयोजित करण्यात आला असून, राज्य व केंद्र पातळीवरील मान्यवरांची उपस्थिती लाभणार आहे.
या वर्धापन दिन कार्यक्रमाचे उद्घाटन आमदार संजय गायकवाड यांच्या हस्ते होणार असून, कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी म्हणून केंद्रीय आयुष मंत्री प्रतापराव जाधव आणि महाराष्ट्र राज्याचे मंत्री आकाश फुंडकर यांची प्रमुख उपस्थिती लाभणार आहे.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी राष्ट्रीय पुरोगामी पत्रकार संघाचे संस्थापक अध्यक्ष विजय सूर्यवंशी असणार आहेत. आठ वर्षांच्या संघर्षमय वाटचालीचा लेखाजोखा मांडत ते पत्रकार संघटनेची भूमिका, ध्येयधोरणे व भावी दिशा स्पष्ट करणार आहेत.
या वर्धापन दिन सोहळ्यात पत्रकारांच्या विविध प्रश्नांवर मार्गदर्शन, संघटनेच्या वर्षभरातील कार्याचा आढावा, तसेच पत्रकार सन्मान व पुरस्कार वितरणाचा कार्यक्रम होणार आहे. पत्रकार संरक्षण कायदा, पत्रकार पेन्शन योजना, ग्रामीण पत्रकारांचे प्रश्न आणि अन्यायग्रस्त पत्रकारांच्या पाठीशी उभे राहण्याच्या संघटनेच्या भूमिकेवर यावेळी विशेष भर देण्यात येणार आहे. हा भव्य व ऐतिहासिक कार्यक्रम गर्दे सभागृह, जिल्हाधिकारी कार्यालयाच्या मागे, बुलढाणा येथे दुपारी 12 वाजता आयोजित करण्यात आला असून, राज्यभरातील पत्रकार, पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन राष्ट्रीय पुरोगामी पत्रकार संघाच्या वतीने आयोजकांनी केले आहे.
