* आ. मनोज कायंदे यांची सांस्कृतिक मंत्र्यांकडे मागणी
सिंदखेडराजा : (एशिया मंच न्यूज )
राष्ट्रमाता राजमाता जिजाऊ माँ साहेब यांचे जन्मस्थान असलेल्या ऐतिहासिक सिंदखेड राजा येथे दरवर्षी होणारा जिजाऊ जन्मोत्सव आता अधिक भव्य दिव्य स्वरूपात साजरा होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. सिंदखेड राजा विधानसभा मतदारसंघाचे आमदार मनोज कायंदे यांनी राज्याचे सांस्कृतिक कार्य मंत्री ना. अॅड. आशिष शेलार यांना पत्र लिहून, सिंदखेड राजा येथे 'वेरुळ महोत्सवा'च्या धर्तीवर १० दिवसांचा 'जिजाऊ उत्सव' शासकीय स्तरावर साजरा करण्याची मागणी केली आहे.
आमदार मनोज कायंदे यांनी दिलेल्या पत्रात नमूद केल्यानुसार, सिंदखेड राजा हे ऐतिहासिक वारसा लाभलेले ठिकाण आणि राष्ट्रमाता जिजाऊंचे जन्मस्थान आहे. येथे दरवर्षी १२ जानेवारी रोजी जिजाऊ जन्मोत्सव मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. मात्र, या उत्सवाची व्याप्ती वाढवून तो केवळ एका दिवसापुरता मर्यादित न ठेवता, ३ जानेवारी २०२५ ते १२ जानेवारी २०२५ असा सलग १० दिवस साजरा करण्यात यावा, अशी मागणी त्यांनी केली आहे. संभाजीनगर येथील जगप्रसिद्ध 'वेरुळ महोत्सव' ज्याप्रमाणे सांस्कृतिक विभागाच्या वतीने साजरा केला जातो, त्याच धर्तीवर सिंदखेड राजा येथे हा १० दिवसांचा 'जिजाऊ उत्सव' सांस्कृतिक कार्य विभागाने आयोजित करावा, अशी आग्रही विनंती आ. कायंदे यांनी पत्राद्वारे केली आहे. आता सांस्कृतिक मंत्री आशिष शेलार या मागणीवर काय निर्णय घेतात आणि आगामी जानेवारीत सिंदखेड राजा येथे १० दिवसांचा सांस्कृतिक सोहळा रंगणार का, याकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.
शासनाने ही मागणी मान्य केली तर सिंदखेड राजा येथे १० दिवस विविध सांस्कृतिक कार्यक्रम, ऐतिहासिक देखावे आणि विचारांचे मंथन पाहायला मिळेल. यामुळे केवळ जिजाऊंच्या विचारांचा प्रचार होणार नाही, तर सिंदखेड राजा येथील पर्यटनालाही मोठी चालना मिळेल. बुलढाणा जिल्हावासीयांच्या वतीने ही मागणी करण्यात आल्याचे आमदारांनी पत्रात म्हटले आहे.
