कारवाई न झाल्यास नंदू लवंगे यांचा आंदोलनाचा इशारा
बुलडाणा : (एशिया मंच न्यूज )
तालुक्यातील देऊळघाट गावात गेल्या तीन ते चार महिन्यांपासून चोऱ्यांचे प्रकार मोठ्या प्रमाणात वाढले असून, गावकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे, येत्या 15 दिवसात चोरट्यावर कारवाई न झाल्यास जिल्हा पोलीस अधीक्षक यांच्या कार्यालया समोर आंदोलन करण्याचा इशारा आज 23 डिसेंबर रोजी जिपोअ यांच्याकडे निवेदनाद्वारे दिला आहे.
दिलेल्या निवेदनात नमूद आहे की, चोरट्यानी घरफोडी, रोख रक्कम, सोने-चांदी, शेळी व इतर जनावरे तसेच घरासमोर ठेवलेला शेतमाल व मौल्यवान वस्तू लंपास केल्याच्या घटना घडल्या. तब्बल २० ते २५ होऊनही अद्याप एकाही चोरीचा छडा लागला नसल्याने नागरिकांत संताप व्यक्त होत आहे.
पुढे नमूद आहे की, या गंभीर प्रकरणी बुलडाणा ग्रामीण पोलिस स्टेशनकडून कोणतीही ठोस कारवाई न झाल्याने ग्रामस्थांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. रात्री झोप न लागणे, सतत भीतीत वावरावे लागणे अशी स्थिती निर्माण झाली असल्याचे गावकऱ्यांनी सांगितले. पोलिस प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे भविष्यात आणखी गंभीर गुन्हे घडण्याची शक्यता नाकारता येत नाही, असा इशाराही ग्रामस्थांनी दिला आहे.
यासंदर्भात देऊळघाट येथील सर्व ग्रामस्थांनी जिल्हा पोलिस अधीक्षक बुलडाणा यांच्याकडे निवेदन सादर करून तात्काळ चोऱ्यांचा तपास करून आरोपींना अटक करण्याची मागणी केली आहे. येत्या पंधरा दिवसांत आरोपींचा शोध न लागल्यास व योग्य कारवाई न झाल्यास बुलडाणा जिल्हा पोलिस अधीक्षक कार्यालया समोर लोकशाही मार्गाने उपोषण करण्यात येईल, असा इशाराही देण्यात आला आहे.
यावेळी निवेदन देतांना भाजप नेते नंदू जग्नाथ लवंगे, रिझवान खान , इमरान खान ,भगवान हिवाळे, अनिल भोजे यांच्यासह आदी गावकरी उपस्थित होते .
