* आचारसंहिता भंगाचा गुन्हा दाखल करुन प्रभाग क्रमांक ६ ची निवडणूक स्थगित करावी
बुलढाणा : (एशिया मंच न्यूज )
बुलढाणा येथील आयटीआय मतदान केंद्रावर आज सकाळी बोगस मतदानाचा प्रयत्न करणाऱ्या मतदाराला पोलिसांनी पकडले होते. मात्र आमदार संजय गायकवाड यांचे पुत्र कुणाल गायकवाड व पुतण्या श्रीकांत गायकवाड यांनी पोलिसाच्या हाताला हिसका देऊन बोगस मतदाराला पळवले. याप्रकरणी आचारसंहिता भंगाचा गुन्हा दाखल करुन दोषींवर कडक कारवाई करावी, अशी मागणी माजी आमदार तथा भाजपचे जिल्हाध्यक्ष विजयराज शिंदे यांनी केली.
ग्रामीण भागातील मतदार आणून दुसऱ्याच्या नावावर बोगस मतदान करण्याचा प्रयत्न करण्याचा प्रकार बुलढाणा येथे उघडकीस आला. प्रभाग क्रमांक ६ मध्ये हा प्रकार घडला. हा व्हिडीओ सर्वत्र व्हायरल झाला. आमदार पुत्र कुणाल गायकवाड व पुतण्या श्रीकांत गायकवाड या दोघांनी पोलिसांच्या हातातून बोगस मतदारास पळवल्याचे या व्हिडीओमध्ये स्पष्ट दिसत आहे. याप्रकणी निवडणूक आयोगाने गुन्हा दाखल करावा, अशी मागणी विजयराज शिंदे यांनी केली आहे. निवडणूक आयोगाने या प्रभागाची निवडणूक स्थगित करुन पुन्हा नव्याने घेण्याची मागणी त्यांनी केली आहे. निवडणूक आयोग याप्रकरणी काय निर्णय घेते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
