* शेतकरी -तरुणांनी बैठकीला उपस्थित रहा- डॉ. ज्ञानेश्वर टाले
* न.प.निवडणुक व स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणूकी च्या संदर्भात ठरणार भुमिका !
बुलढाणा : (एशिया मंच न्यूज )
क्रांतीकारी शेतकरी संघटनेची महत्वाची बैठक शनिवारी २९ नोव्हेंबर ला आयोजित केली आहे. रविकांत तुपकर यांनी ही तातडीची व महत्वपूर्ण बैठक बोलावली आहे. शेतकरी, शेतमजूर आणि तरुणांना त्यांच्या हक्कांसाठी बुलढाण्यात होणाऱ्या महत्त्वाच्या बैठकीला मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन जिल्हाध्यक्ष डॉ. ज्ञानेश्वर टाले यांनी केले आहे. शेतकऱ्यांच्या ज्वलंत प्रश्नांवर निर्णायक लढ्याची दिशा ठरवण्यासाठी ही बैठक २९ नोव्हेंबर २०२५ रोजी सकाळी ११ वाजता शिवगड हॉटेल (गोलांडे लॉन्स), चिखली रोड, बुलढाणा येथे आयोजित करण्यात आली आहे.
अतीवृष्टी व कर्जबाजारी पणामुळे शेतकरी हवालदिल झाला आहे. सरकार च्या चुकीच्या धोरणामुळे शेतकरी संकटात सापडला आहे. अशा परीस्थितीत शेतमालाचे भाव सुद्धा पडले आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांना मध्यप्रदेशच्या धर्तीवर महाराष्ट्रातही सोयाबीन कापूस भावफरक योजना सरकार ने राबविली पाहिजे शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळावी पिक विमा प्रलंबित आहे. यांसह इतर मागण्यावर बैठकीत खलबतं होण्याची शक्यता आहे.
या बैठकीत पुढील प्रमुख मागण्यांवर तीव्र संघर्ष छेडण्याची रणनीती ठरवली जाणार आहे, राज्यातील शेतकऱ्यांना सरसकट कर्जमुक्ती मिळालीच पाहिजे. सोयाबीन आणि कापूस उत्पादकांना उत्पादन खर्चावर आधारित योग्य भाव मिळाला पाहिजे. नैसर्गिक संकटात शेतकऱ्यांचा हक्क असलेला १०० टक्के पीक विमा तातडीने मंजूर व्हावा. शेतीचे प्रचंड नुकसान करणाऱ्या जंगली जनावरांच्या त्रासातून शेतकऱ्यांची कायमची मुक्तता करा. त्यासाठी शेतीला मजबूत कंपाउंड द्या, जळालेले शेतीचे ट्रान्सफॉर्मर विलंब न लावता तात्काळ बदलून द्या. शेतमजूर आणि कष्टकऱ्यांच्या कल्याणासाठी स्वतंत्र शेतमजूर महामंडळ स्थापन करा, यासह इतर शेतकरी प्रश्नांवर चर्चा करून पुढील शेतकरी आंदोलनाची दिशा ठरविली जाणार आहे. यासह येणाऱ्या काळात होऊ घातलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणूकी च्या संदर्भात सुद्धा व न.प.निवडणुकीसंदर्भात चर्चा होणार असल्याचे सांगितले जाते आहे.
शेतकऱ्यांच्या प्रश्नांसाठी अनेकवेळा रस्त्यावर उतरून सरकारला झुकवणारे रविकांत तुपकर या बैठकीत प्रमुख मार्गदर्शक म्हणून उपस्थित राहणार आहेत. या बैठकीकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले आहे. या बैठकीचे आयोजन क्रांतीकारी शेतकरी संघटना, बुलढाणा यांनी केले असून, शेतकरी, शेतमजूर आणि तरुण वर्गाने मोठ्या संख्येने उपस्थित राहून या लढ्याला बळ द्यावे, असे आवाहन क्रांतिकारी शेतकरी संघटनेचे बुलढाणा जिल्हाध्यक्ष डॉ. ज्ञानेश्वर टाले यांच्या वतीने करण्यात आले आहे.
