तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शनात शिवसाईचा दबदबा

तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शनात शिवसाईचा दबदबा
बुलढाणा : (एशिया मंच न्यूज )
        26 नोव्हेंबर 2025 रोजी संपन्न झालेल्या विज्ञान प्रदर्शनाचे आयोजन शिक्षण विभाग पंचायत समिती बुलढाणा व तालुका विज्ञान शिक्षक संघटना यांच्या संयुक्त विद्यमाने बुलढाणा तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शनाचे आयोजन केंद्रीय सैनिक शाळा कोलवड बुलढाणा या ठिकाणी करण्यात आले होते. 
         वैज्ञानिक उपकरणे मध्ये अनुक्रमे प्राथमिक व माध्यमिक असे दोन गटात आयोजन करण्यात आले होते. या विज्ञान प्रदर्शनामध्ये शिवसाई युनिव्हर्सल ज्ञानपीठ कोलवड व शिवसाई ज्ञानपीठ सागवन व मासरुळ तीन शाळांनी सहभाग नोंदविला होता. प्राथमिक गटामध्ये त्रिशा वैभव पाटील ने सादर केलेल्या सस्टेनेबल अँग्रीकल्चरल फार्म या उपकरणाद्वारे शेतकरी राजा इतर महागडे उपकरणांवर अवलंबून न राहता स्वावलंबी शेती कशी करू शकतो याची माहिती दिली. 
       माध्यमिक गटामध्ये पवन सचिन कापसे, प्रतीक जाधव यांनी बनवलेल्या रडार सिस्टम या विज्ञान उपकरणात त्यांनी द्वितीय क्रमांक संपादन केला तर वेदिका मुळे निबंध स्पर्धेत प्रथम क्रमांक संपादन केला. भाषण स्पर्धेत मोहिनी डुकरे हिने प्रथम क्रमांक संपादन केले असून प्राथमिक गटात संस्कृती धंदर तिने वकृत्व स्पर्धेत प्रथम क्रमांक संपादन केला. अक्षदा सपकाळला देखील वक्तृत्व स्पर्धेमध्ये प्रोत्साहन पर बक्षीस मिळाले
          या प्रदर्शनात विद्यार्थ्यांनी उत्कृष्ट अशी तयारी करून घवघवीत यश संपादन केले या विद्यालयातील विज्ञान शिक्षक अश्विनी बंगाळे, गोपाल आडवे, प्रिती नायडू या शिक्षकांनी व पालकांनी मोलाचे मार्गदर्शन केले.  या यशाबद्दल शिवसाई युनिव्हर्सल ज्ञानपीठचे संचालक  डी.एस. लहाने यांनी विद्यार्थ्यांचे , मार्गदर्शक शिक्षक व पालकांचे अभिनंदन करीत पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. शाळेचे प्राचार्य प्रमोद मोहरकर यांनी देखील विद्यार्थ्यांना जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या. विविध स्पर्धेत सहभागी होऊन यश संपादन करावे असे आवाहन केले.