* आघाडी असतांनाही विश्वासघात केल्याचा प्रशांत वाघोदेंचा आरोप
* बुलढाण्यात कुणालाच पाठिंबा नाही; वंचितचे चार उमेदवार रिंगणात
बुलढाणा : (एशिया मंच न्यूज )
काँग्रेसने बुलढाणा नगर पालिकेत परस्पर नगराध्यक्षपदाचा उमेदवार घोषित केला. आघाडी झालेली असतांना सुद्धा वंचितला विश्वासात घेतले गेले नाही, असा आरोप करीत पक्षाचे नेते प्रशांत वाघोदे यांनी नाराजी व्यक्त केली. तर बुलढाण्यात अद्याप कुणालाच पाठिंबा दिलेला नसून वंचितचे चार उमेदवार रिंगणात असल्याचे त्यांनी सांगितले.
आज 28 नोव्हेंबर रोजी स्थानिक पत्रकार भवनात आयोजित पत्रकार परिषदेत वाघोदे यांनी वंचित बहुजन आघाडीची भूमिका मांडली. ते म्हणाले, काही दिवसांपूर्वी काँग्रेस आणि वंचितने संयुक्त बैठक घेऊन जिल्ह्यात आघाडी झाल्याचे पत्रकार परिषदेत घोषित केले होते. आम्हाला सन्मानपूर्वक जागा मिळेल, या आशेवर आम्ही काँग्रेससोबत आलो होतो. परंतु त्यांनी आम्हाला विश्वासात घेतले नाही. परस्पर उमेदवार आणि नगराध्यक्षपदाचे उमेदवार जाहीर करून उमेदवारी अर्ज भरले. आम्हाला त्यांचा हा विश्वासघात समजला. त्यामुळे आम्ही इतर ठिकाणी आमचेही नगराध्यक्ष पदासाठी उमेदवार घोषित केले. आम्ही तिथे वैयक्तिकपणे लढत आहोत. बुलढाणा शहरात आमचा कोणालाच पाठिंबा नाही, असेही वाघोदे यांनी पत्रकार परिषदेत सांगितले. बहुजन वंचित आघाडीचे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार डॉ. संगीता हिरोळे यांनी ज्या दिवशी उमेदवारी अर्ज भरला त्यावेळी मी उपस्थितीत होतो. परंतु त्यांनी ज्यावेळी उमेदवारी अर्ज मागे घेतला त्यावेळी बहुजन आघाडीचा एकही पदाधिकारी किंवा सदस्य उपस्थित नव्हता. हिरोळे यांनी त्यांचे वैयक्तिक कारण सांगून उमेदवारी अर्ज मागे घेतला आहे, असेही त्यांनी सांगितले.
* वंचितच्या चारही उमेदवाराना निवडून आणणार
बुलढाणा नगर परिषदेसाठी प्रभाग क्रमांक ५ ब अब्दुल हमीद अब्दुल कादर, प्रभाग क्रमांक १३
वैशाली विजय गवई, प्रभाग क्रमांक ९ अ प्रदीप राघो मोरे आणि ९ ब मधून
नगमा समीर खान रिंगणात असून आम्ही त्यांना निवडून आणण्यासाठी प्लॅनिंग केले आहे. त्यांना नक्कीच विजयी करू, असा ठाम विश्वास वाघोदे यांनी यावेळी व्यक्त केला.
* चर्चांना पूर्णविराम देण्यासाठी मांडली भूमिका
मागील आठ दिवसात शहरात बराच चर्चा घडत आहेत. त्यामुळे आम्हालाही आज पत्रकार परिषद घेणे आवश्यक होती. त्यामुळे ही पत्रकार परिषद घेतल्याचे सांगत कोणालाही जाहीर पाठिंबा देत नाही, असे आम्ही जाहीरपणे सांगू इच्छितो. समविचारी पक्षाला पाठिंबा देऊ, असे आमचे सर्वेसर्वा बाळासाहेब आंबेडकर यांनी सांगितले होते. त्यामुळे येथे भाजप आणि भाजपच्या मित्र पक्षाला कुठेच पाठींबा देणार नाही. काँग्रेससोबत आघाडी केली होती. परंतु त्यांनी आमचा विश्वासघात केला. त्यामुळे आम्ही आता बुलढाणा शहरात कोणत्याही पक्षाला जाहीर पाठिंबा देणार नसल्याचे वाघोदे म्हणाले.
