वंचितच्या विड्रॉलने महाविकास आघाडीला बळ!* डॉ. संगीता हिरोळे यांचा अर्ज मागे; बुलढाणा नगराध्यक्ष निवडणुकीतील चुरस वाढली

वंचितच्या विड्रॉलने महाविकास आघाडीला बळ!
* डॉ. संगीता हिरोळे यांचा अर्ज मागे; बुलढाणा नगराध्यक्ष निवडणुकीतील चुरस वाढली
बुलढाणा : (एशिया मंच न्यूज )
       काँग्रेससोबत आघाडी झाल्यानंतरही वंचितने बुलढाण्यात नगराध्यक्ष पदासाठी अर्ज दाखल केल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या होत्या. मात्र आज २० नोव्हेंबर रोजी वंचितच्या उमेदवाराने अर्ज मागे घेत आघाडी धर्म पाळला. वंचित बहुजन आघाडीमुळे बुलढाण्यात काँग्रेसला बळ मिळाले असून तब्बल नऊ  वर्षांनी होणाऱ्या नगराध्यक्ष पदाच्या निवडणुकीतील चुरस वाढली आहे. 

       काँग्रेस आणि वंचितच्या आघाडीबाबत प्रत्येक निवडणुकीत चर्चा होते. जागावाटपाबाबत अनेक बैठक पार पडतात. मात्र शेवटच्या क्षणी आघाडी फिस्कटते, हा अनुभव आहे. परंतु यावेळी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीत वंचित- काँग्रेस आघाडीवर शिक्कामोर्तब झाले. काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष राहुल बोन्द्रे आणि वंचितच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांनी पत्रकार परिषद घेऊन आघाडीची घोषणा केली. हा पॅटर्न राज्यभर राबवण्याचे जाहीर करण्यात आले. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी वंचितचे सर्वेसर्वा बाळासाहेब आंबेडकर यांच्यासोबत केलेली बोलणी महत्वाची ठरली. आघाडी असतांना सुद्धा ऐनवेळी वंचित बहुजन आघाडीने बुलढाण्यात नगराध्यक्ष पदासाठी नामांकन अर्ज दाखल केला होता. परिणामी, महाविकास आघाडीकडून अधिकृत उमेदवार असलेल्या कॉँग्रेसच्या लक्ष्मीताई काकस यांच्यापुढे मोठा पेच निर्माण झाला होता. मतविभाजनाचा तीव्र धोका असल्याने काँग्रेसची डोकेदुखी वाढली होती. मात्र २० नोव्हेंबर रोजी वंचितकडून नगराध्यक्ष पदासाठी दाखल केलेले नामांकन मागे घेण्यात आल्याने आघाडीसह विशेषतः काँग्रेसला सुखद धक्का मिळाला.