सरकारचे धोरण, शेतकऱ्यांचे मरण : रविकांत तुपकर* निंबोऱ्यात तुपकरांची तोफ धडाडली ; शेतकऱ्यांनी संघटित होऊन लढण्याचे आवाहन

सरकारचे धोरण, शेतकऱ्यांचे मरण : रविकांत तुपकर
* निंबोऱ्यात तुपकरांची तोफ धडाडली ; शेतकऱ्यांनी संघटित होऊन लढण्याचे आवाहन
जळगाव जामोद : (एशिया मंच न्यूज )
         क्रांतिकारी शेतकरी संघटनेच्या वतीने 20 नोव्हेंबर रोजी तालुक्यातील निंबोरा येथे शेतकरी, कष्टकरी आणि मजुरांचा एल्गार मेळावा आयोजित करण्यात आला होता. यावेळी संघटनेचे नेते रविकांत तुपकर यांनी आपल्या भाषणातून शेतकरी प्रश्नांवर सरकारला धारेवर धरले आणि शेतकऱ्यांना संघटित होऊन लढण्याचे आवाहन केले.

          मेळाव्याच्या सुरूवातीला तरुणांनी गावामध्ये रविकांत तुपकर यांचे जंगी स्वागत करून गावामधून वाजत गाजत मिरवणूक काढली व नंतर मेळाव्याला सुरुवात करण्यात आली. या मेळाव्याला परिसरातील शेतकरी, शेतमजूर, महिला व तरुण मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.

            यावेळी बोलताना रविकांत तुपकर म्हणाले,  आज शेतकऱ्यांची अवस्था बिकट झाली आहे.  याला सरकारचे धोरण जबाबदार आहे. सरकारचे धोरण म्हणजे शेतकऱ्यांचे मरण आहे, अशा शब्दांत त्यांनी सरकारवर हल्ला चढवला. सोयाबीन, कापसाला योग्य भाव मिळावा यासाठी पुन्हा आंदोलन करावे लागेल, असे त्यांनी स्पष्ट केले. शेतमालाला उत्पादन खर्चावर आधारित भाव मिळालाच पाहिजे,अशी त्यांची मुख्य मागणी होती.

        शेतकऱ्यांच्या सद्यस्थितीवर त्यांनी तीव्र चिंता व्यक्त केली. ते म्हणाले की, रोज १० ते १२ शेतकरी आत्महत्या करत आहेत. कष्ट करूनही शेतकरी कर्जबाजारी झाला आहे. सर्व वस्तूंचे भाव वाढले, पण शेतमालाचे भाव वाढले नाहीत. शेतमालाला भाव नसल्यामुळे शेतकऱ्यांच्या मुला-मुलींची लग्ने होत नाहीत, अशी गंभीर अवस्था आहे. यासाठी शेतकऱ्यांनी एकत्र येऊन दबावगट निर्माण करून संघटित होणे गरजेचे आहे. त्यांनी लोकांना घरात नेत्यांचे नव्हे, तर आई-वडिलांचे फोटो लावण्याचे भावनिक आवाहन केले.

          संघर्षाचे महत्त्व पटवून देताना तुपकर यांनी आपला अनुभव सांगितला.  मलाही पीक विम्यासाठी आंदोलन केल्यामुळे सात दिवस अकोला जेलमध्ये राहावे लागले, त्यानंतर पीक विमा मिळाला. लढणाऱ्या व्यक्तींच्या पाठीशी उभे राहण्याचे आवाहन करत त्यांनी सांगितले की, मी सामान्य घरातील मुलगा आहे, भगतसिंगांच्या विचाराने प्रभावित आहे.  शेतकरी हितासाठी लढतो. गंभीर गुन्हे अंगावर घेतो. आमदार-खासदारांपेक्षा शेतकऱ्यांसाठी लढणाऱ्यांच्या पाठीशी उभे राहा, असेही त्यांनी सांगितले.

           तुपकर यांनी आपल्या भाषणात सोयापेंडची निर्यात त्वरित सुरू करावी, शेतकऱ्यांचे संपूर्ण कर्जमाफ करावे, अशा प्रमुख मागण्या केल्या. विदर्भात ऊस उत्पादकांसारखी एकजूट नसल्याबद्दल खंत व्यक्त केली. पंजाब च्या शेतकऱ्यांनी शेती विरोधी कायदे रद्द करण्यासाठी प्रदिर्घ लढा दिला, तसा लढा उभारावा लागेल यासाठी तयार राहा,असे तुपकर म्हणाले. शेतकऱ्यांच्या न्याय हक्कासाठी साठी संघर्ष करण्याची तयारी दाखवली प्रसंगी शेतकऱ्यांसाठी तुरुंगात जायची वेळ आली तरी मागे हटणार नाही, आम्ही शेतकऱ्यांसाठी मरायला तयार आहोत, असा निर्धार त्यांनी व्यक्त केला.

            यासोबतच त्यांनी शेतमजुरांसाठी महामंडळ स्थापन करण्याची आणि त्यांच्यासाठीही लढा उभारण्याची घोषणा केली. भाषणाच्या शेवटी त्यांनी शेतकऱ्यांना आत्महत्या न करण्याचे आवाहन केले. तसेच, खासगी फायनान्स कंपन्यांच्या अधिकाऱ्यांनी चुकीच्या पद्धतीने बेकायदा वसुली करणाऱ्यांना त्यांनी तीव्र इशारा दिला. ते म्हणाले प्रायव्हेट कंपनीच्या अधिकाऱ्यांना इशारा देत आहे, जर दुपटीपेक्षा जास्त वसुली केली तर खबरदार कंपन्यांचे ऑफीस ठीकाणावर ठेवणार नाही, असे ठणकावून सांगितले.

           यावेळी मोठ्या संख्येने शेतकरी, शेतमजूर कामगारांची उपस्थिती सभेला होती. सभेच्या शेवटी कर्जमाफी मिळालीच पाहिजे, हक्काचा पिकविमा मिळालाच पाहिजे, शेतकरी एकजुटी चा विजय असो अशा घोषणांनी परिसर दणाणून गेला. राष्ट्रगीताने सभेची सांगता करण्यात आली.