पिकविम्यासाठी 'क्रांतिकारी'ची मलकापूर ते बुलढाणा मोटार सायकल रॅली..!* कृषी अधीक्षकांना दिले निवेदन * रविकांत तुपकरांच्या नेतृत्वाखाली तिव्र आंदोलनाचा इशारा

पिकविम्यासाठी 'क्रांतिकारी'ची मलकापूर ते बुलढाणा मोटार सायकल रॅली..!
* कृषी अधीक्षकांना दिले निवेदन 
* रविकांत तुपकरांच्या नेतृत्वाखाली तिव्र आंदोलनाचा इशारा
बुलढाणा : (एशिया मंच न्यूज )
        क्रांतिकारी शेतकरी संघटनेच्या वतीने पिकविम्यासाठी आज 25 नोव्हेंबर रोजी मलकापूर ते बुलढाणा भव्य मोटार सायकल रॅली काढून बुलडाणा येथे कृषी अधीक्षक कार्यालयात पिकविमा मिळण्यासाठी निवेदन सादर करण्यात आले. क्रांतिकारी शेतकरी संघटनेच्या वतीने प्रलंबित पिक विमा मिळण्यासाठी मलकापूर ते बुलढाणा मोटार सायकल रॅली काढण्यात आली.

        यामध्ये शेकडो शेतकऱ्यांनी सहभाग घेतला बुलढाणा शहरातील स्थानिक जयस्तंभ चौक येथे रॅली आल्यानंतर क्रांतिकारी शेतकरी संघटनेच्या वतीने अमोल मोरे व सहकाऱ्यांनी मलकापूर येथील शेतकऱ्यांचे पुष्पहार घालून स्वागत केले व तेथुन कृषिअधिकारी कार्यालयात जात निवेदन सादर केले. खरीप हंगाम २०२४ मध्ये मलकापूर तालुक्यातील २१ हजार शेतकरी पीक विम्यापासून वंचित असल्याची गंभीर बाब या निवेदनात नमूद करण्यात आली आहे.अनेक महिन्यांपासून
शेतकरी पिकविमा रकमेची प्रतीक्षा करीत आहेत. विमा कंपन्यांकडून वेळोवेळी दिली जाणारी आश्वासने, प्रणालीतील विलंब आणि प्रशासनाच्या निष्काळजीपणामुळे शेतकऱ्यांच्या संयम सुटत आहे शेतकऱ्यांना प्रलंबित पिक विमा मिळावा यासाठी क्रांतिकारी शेतकरी संघटनेच्या वतीने मलकापूर ते बुलढाणा मोटारसायकलींची भव्य रॅली काढण्यात आली.

       निवेदनानुसार, मलकापूर तालुक्यात खरीप २०२४ मध्ये २७हजार शेतकऱ्यांचा पीक विमा मंजूर झाला आहे, परंतु आतापर्यंत केवळ ६हजार शेतकऱ्यांनाच विम्याचे पैसे मिळाले आहेत. उर्वरित सुमारे २१ हजार शेतकरी अजूनही विम्याच्या प्रतीक्षेत आहेत. याचा अर्थ मलकापूर तालुक्यात जवळपास फक्त २० टक्के शेतकऱ्यांना पीक विमा मिळाला असून, याउलट उर्वरित ठिकाणी ८० ते ९० टक्के शेतकऱ्यांना विम्याचा लाभ मिळाला आहे.क्रांतिकारी चे युवा नेते सचिन शिंगोटे यांनी या प्रकारावर तीव्र आक्षेप घेत, हा मलकापूर तालुक्यावर झालेला अन्याय असल्याचे निवेदनात म्हटले आहे. त्यांनी कृषी अधीक्षकांना विनंती केली आहे की, त्यांनी या अन्यायाची दखल घेऊन, वंचित असलेल्या मलकापूर तालुक्यातील शेतकऱ्यांना तात्काळ पिक विम्याचा लाभ मिळावा, अशी नम्र विनंती त्यांनी केली आहे.

     यावेळी सचिन शिंगोटे, अमोल मोरे,महेंद्र जाधव, आकाश माळोदे, पवन काकडे,आमिन खासाब, सचिन खंडारे,राजु गवळी यांच्यासह मलकापूर तालुक्यातील शेकडो शेतकरी व क्रांतिकारी संघटनेचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते. पिकविम्याची रक्कम तात्काळ जमा न झाल्यास क्रांतिकारी शेतकरी संघटनेच्या वतीने रविकांत तुपकर यांच्या नेतृत्वाखाली तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशाराही यावेळी देण्यात आला.