चिखलीमध्ये भाजपचा नगराध्यक्ष निवडून द्या... * विकासाची जबाबदारी माझी : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

चिखलीमध्ये भाजपचा नगराध्यक्ष निवडून द्या... 
* विकासाची जबाबदारी माझी :  मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
चिखली : (एशिया मंच न्यूज )
         चिखलीच्या लोकप्रिय आमदार श्वेताताई महाले यांनी विकासासाठी मागितलेल्या प्रत्येक निधीला शासनाने सकारात्मक प्रतिसाद दिला. त्याचा ठोस परिणाम चिखलीमध्ये रस्ते, पाणीपुरवठा, स्वच्छता आणि इतर भौतिक सुविधांमधील सुधारणा मधून दिसून येत आहे. त्यामुळे आता आ. सौ. श्वेताताई महाले यांच्या मार्गदर्शनात चिखली नगरपालिका विकासाच्या वेगळ्या उंचीवर घेऊन जाण्याची संधी चिखलीकरांना मिळाली आहे, त्याचे सोने करा, असे उद्गार महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनी आज 25 नोव्हेंबर रोजी चिखली येथे काढले.

        चिखली शहरातील नगराध्यक्ष पदाचे भाजप उमेदवार  पंडितदादा देशमुख यांच्यासह 28 नगरसेवक उमेदवारांच्या प्रचारासाठी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज चिखलीत दाखल झाले. माता रेणुका मंदिराच्या पावन सान्निध्यात मुख्यमंत्री फडणवीस यांचे भव्य स्वागत चिखली विधानसभा मतदारसंघाच्या आमदार श्वेताताई महाले पाटील यांच्या हस्ते करण्यात आले.

       यावेळी आमदार श्वेताताई महाले यांनी मुख्यमंत्री फडणवीस यांचा विदर्भाचा कोहिनूर असा गौरव करताना, देवेंद्रजी जेव्हा-जेव्हा चिखलीत येतात, तेव्हा या राजकीय चिखलात कमळच फुलते. त्यामुळे आजची सभा ही विजयाची सभा ठरेल, असे आत्मविश्वासाने सांगितले.

आमदार महाले यांनी चिखलीचा चेहरामोहरा बदलला :  मुख्यमंत्री फडणवीस

         आपल्या भाषणात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, चिखलमय रस्त्यांमुळे चिखलीला नाव मिळाले होते, मात्र तीन वर्षांत श्वेताताई महाले यांनी केलेल्या विकासामुळे चिखली प्रगतीच्या दिशेने धडाडीने आगेकूच करत आहे, असे मुख्यमंत्र्यांनी गौरवोद्गार काढले.

* भ्रष्टाचारावर फडणवीस यांचा टोला
      दीर्घकाळ नगरपालिका चालवणाऱ्या विशिष्ट कुटुंबावर टीका करत फडणवीस म्हणाले की, त्यांना सामान्यांचे काही देणे-घेणे नव्हते. भाजपा मात्र भ्रष्टाचाराला कधीही स्थान देत नाही. स्वतःच्या नगराध्यक्षाने चुकी केली तरी त्याला काढून टाकण्याचे धैर्य भाजपामध्येच आहे, आणी चिखलीमध्येच आ. सौ. महाले यांनी अशा भ्रष्ट नगराध्यक्षाला पदावरून काढून पारदर्शकतेचा पायंडा घालून दिला आहे, असे त्यांनी स्पष्ट केले.

* विकास योजनांवर महत्त्वपूर्ण घोषणा

      आमदार श्वेताताई महाले यांनी चिखलीकरांसाठी, 128 कोटींची पाणीपुरवठा योजना, वायझडी तलावासाठी 14 कोटी, रस्त्यांसाठी 130 कोटी, विविध प्रकल्पांसाठी 80 कोटी असे शेकडो कोटींचा निधी आणला आहे. यासाठी आमदार श्वेताताई महाले यांचे विशेष अभिनंदन करताना मुख्यमंत्री म्हणाले की, चिखली शहरात उभारला जाणारा छत्रपती शिवाजी महाराजांचा अश्वारूढ पुतळा हा चिखलीकरांसाठी अतिशय अभिमानाची बाब ठरेल त्याच पार्श्वभूमीवर घटनेचे निर्माते महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर, महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुले यांच्या पुतळ्यांचीदेखील त्यांनी घोषणा केली.

* नगरपालिकेची सत्ता भाजपाकडे देण्याचे आवाहन
         शहराच्या वाढत्या लोकसंख्येनुसार शिक्षण, आरोग्य, स्वच्छता, भुयारी गटार, घनकचरा व्यवस्थापन यांसारख्या प्रकल्पांसाठी भाजपाकडे तयार ‘विकास ब्ल्यू प्रिंट’ पुढे नेण्यासाठी भाजपा सक्षम असल्याचे सांगत त्यांनी मतदारांना पंडित दादा देशमुख यांना नगराध्यक्षपदी निवडून देण्याचे आवाहन केले. चार इंजिनची ताकद  केंद्र सरकार, राज्य सरकार, आमदार आणि भाजपा नगरपालिका मिळाल्यास चिखलीचा विकास वेगाने होईल, असे फडणवीस म्हणाले.
* अफवा पसरवणाऱ्या विरोधकांवर निशाणा
      बुलढाणा जिल्ह्यामध्ये काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष देखील राहतात व येथील प्रदेशाध्यक्ष व जिल्हाध्यक्ष यांना फक्त अफवा पसरवण्याचे काम असून संविधानाबद्दल, बॉम्बे मार्केट बद्दल आणि विविध विकासाच्या योजना बद्दल हे दोघे नेहमी अफवा पसरवत असतात असे आमदार श्वेताताई महाले पाटील यांनी मुख्यमंत्री  देवेंद्र फडणवीस यांचे लक्षात आणून दिले तेव्हा काँग्रेसला आता महाराष्ट्रात कोणीही ओळखत नसलेला प्रदेशाध्यक्ष मिळालेला आहे, त्यामुळे ओळख मिळवण्यासाठी तेवढीच कामे त्यांना उरली आहे, अशी टीका मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली. संविधान बदल, बॉम्बे मार्केट, विकास योजना यावर विरोधकांकडून पसरवल्या जाणाऱ्या अफवा निराधार आहेत.  बॉम्बे मार्केटला कोणी हात लावणार नाही. व्यापारी जे ठरवतील तेच होईल, असा शब्द त्यांनी दिला.

      या सभेला कामगार मंत्री ऍड. आकाश फुंडकर, जिल्हाध्यक्ष विजयराज शिंदे, डॉ. प्रतापसिंग राजपूत, ऍड. विजयकुमार कोठारी, नगराध्यक्षपदाचे उमेदवार पंडित दादा देशमुख, प्रकाश महाराज जवंजाळ, सुरेश कबुतरे, सतीश गुप्त, विजय गवई, आशुतोष गुप्त, शिवराज पाटील आणि 28 नगरसेवक उमेदवार उपस्थित होते.