* व्यंकटगिरीवर रंगणार संगीत भजन * गुरुवारी महाप्रसाद
बुलढाणा : (एशिया मंच न्यूज )
राजुर घाटातील निसर्गरम्य वातावरणात व्यंकटगिरी पर्वतावर वसलेल्या बालाजी मंदिरात दरवर्षी प्रमाणे यावर्षी देखील ब्रह्मोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. 24 नोव्हेंबर रोजी सायंकाळी कलश पूजनाने या ब्रह्मोत्सवाची सुरुवात झाली आहे. 25 व 26 नोव्हेंबर रोजी भजन संगीत कार्यक्रम तसेच विविध धार्मिक कार्यक्रम पार पडणार असून 27 नोव्हेंबर रोजी महाप्रसादाने ब्रह्मोत्सवाची सांगता होणार आहे.
श्री बालाजी सेवा समिती व बालाजी मंदिर संस्थान यांच्यावतीने दरवर्षी व्यंकटगिरी पर्वतावर मोठा थाटामाटात आणि भक्तीपूर्ण वातावरणात ब्रह्मोत्सवाचे आयोजन केले जाते. यावर्षी उत्सवाचे हे पंधरावे वर्ष आहे. यंदा देखील मोठ्या थाटामाटात या ब्रह्मोत्सवाची सुरुवात झाली आहे. 24 नोव्हेंबर रोजी सायंकाळी कलश पूजनाने विधिवत ब्रह्मोत्सवाचा थाटात शुभारंभ करण्यात आला. 24 ते 27 नोव्हेंबर अशा चार दिवस चालणाऱ्या या ब्रह्मोत्सवात होम - हवन, यज्ञ, पूजा या सोबतच भजन संगीत कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. तर 27 नोव्हेंबर रोजी महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध युवा कीर्तनकार विदर्भ कोकिळा नावाने प्रसिद्ध असणाऱ्या ह.भ. प. तेजस्विनी दीदी पाठक मलकापूर यांचे काल्याचे किर्तन होणार आहे. दरम्यान 24 नोव्हेंबर ते 27 नोव्हेंबर या कालावधीत दररोज सकाळी 8 ते दुपारी 12 वाजेपर्यंत भागवत प्रार्थना, यजमान संकल्प, कुंभ आवाहन, अग्नी प्रविष्ट आणि तीर्थप्रसाद तर सायंकाळी 5 ते 8 या वेळेत यजमान संकल्प, रक्षाबंधन, हवन आणि तीर्थप्रसाद असे दैनंदिन कार्यक्रम होणार आहेत. 25 व 26 नोव्हेंबर रोजी दुपारी 2 ते 4 या वेळेत भजन संगीत कार्यक्रम होणार आहे. या ब्रह्मोत्सवातील विशेष आकर्षण असलेला कल्याण उत्सव अर्थात श्रीदेवी- भूदेवी सोबत श्री बालाजींचा विवाह सोहळा 26 नोव्हेंबर रोजी सायंकाळी 7 वाजता पार पडणार आहे तर 27 नोव्हेंबर रोजी सकाळी दहा वाजता श्री बालाजी 108 कलशाभिषेक होणार आहे. त्यानंतर ह. भ. प. तेजस्विनी दीदी पाठक यांचे काल्याचे किर्तन पार पडणार आहे. काल्याचे किर्तन झाल्यानंतर महाप्रसाद वाटपास सुरुवात होणार आहे. या ब्रह्मोत्सवातील सर्व कार्यक्रमांचा तसेच महाप्रसादाचा जास्तीत जास्त भाविकांनी लाभ घ्यावा, असे आवाहन श्री बालाजी सेवा समितीचे अध्यक्ष अरुण दिवटे व बालाजी सेवा समितीच्या इतर सदस्यांनी केले आहे.
