* क्रांतिकारी शेतकरी संघटनेची जिल्हा बैठक उत्साहात
बुलडाणा : (एशिया मंच न्यूज )
बुलडाणा शहरातील स्थानिक शिवगड हॉटेल -गोलांडे लॉन येथे क्रांतिकारी शेतकरी संघटनेची महत्त्वपूर्ण बैठक मोठ्या उत्साहात 29 नोव्हेंबर रोजी पार पडली. बैठकीत उपस्थित कार्यकर्त्यांना संबोधित करताना संघटनेचे प्रमुख नेते रविकांत तुपकर यांनी शेतकरी प्रश्न, संघटनेची भूमिका, आगामी आंदोलन आणि निवडणूक तयारी याबाबत सविस्तरपणे भाष्य केले. तुपकर म्हणाले की, शेतकऱ्यांचे प्रश्न अद्यापही दुर्लक्षित आहेत. सोयाबीन, कापूस यांसारख्या पिकांना योग्य भाव मिळाला पाहिजे. जंगली जनावरांच्या वाढत्या त्रासामुळे शेतकरी बेचैन आहे. शेतकऱ्यांच्या या वेदना संपवण्यासाठी आम्ही लढत आलो आहोत आणि पुढेही तितक्याच ताकदीने लढत राहणार.
पुढे तुपकर म्हणाले की, महाराष्ट्रातील सर्व शेतकऱ्यांना एकत्र करून भक्कम नवी शेतकरी चळवळ उभी करायची आहे. स्व. शरद जोशी यांच्या विचारांनी प्रेरित होत मी चळवळीत आलो. त्यांची पुस्तके वाचून शेतकऱ्यांच्या गरिबीची खरी कारणमीमांसा समजली. सरकारची धोरणेच शेतकऱ्यांच्या दारिद्र्याची मुळं आहेत. सरकारचे धोरण म्हणजे शेतकऱ्यांचे मरण, असा त्यांनी जोरदार आरोप केला. लोकसभेत पराभव झाला असला तरी आम्ही शेतकऱ्यांची एकता मजबूत केली आहे. कार्यकर्त्यांच्या अथक परिश्रमामुळे अडीच लाख लोकांना आम्ही एकत्र आणलं. हा पराभव नसून शेतकरी चळवळीचा पाया आहे.
तुपकर यांनी घोषित केले की, क्रांतिकारी शेतकरी संघटना आगामी जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुका लढवणार आहे. पद मिळवणे महत्त्वाचे नसून पदाला न्याय देणे महत्त्वाचे आहे. जन्माला आलो, तेव्हा हात स्वच्छ होते, ते तसेच ठेवायचे आहेत. माझ्यावर कोणताही डाग नको, अशी स्पष्ट भूमिका त्यांनी मांडली. संघटनेचे जाळे गावोगावी, घराघरांत पोहोचवायचे आहे. लवकरच मोठ्या जिल्हा स्तरावरील कार्यकारिणीची घोषणा केली जाईल. आठ ते पंधरा दिवसांत जिल्ह्यातील पदाधिकारी नियुक्त केले जातील. महाराष्ट्रभर संघटना जोमाने उभी राहत असून कार्यकर्त्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे.
नागपूरमध्ये झालेल्या आंदोलनाचा उल्लेख करत तुपकर म्हणाले की, त्या आंदोलनामुळे सरकारकडून तारीख मिळाली, मात्र शेतकऱ्यांचे प्रश्न सुटलेले नाहीत. त्यामुळे पुन्हा एकदा आंदोलनाचे हत्यार काढावे लागेल. मोठे आंदोलन उभारून सरकारवर दबाव आणावा लागेल. जंगली जनावरांचा प्रश्न, पिकांना हमीभाव, कर्जमाफी, पिक विमा या सर्व मुद्द्यांवर मोठ्या प्रमाणात लढा उभारणे आवश्यक आहे. ते म्हणाले की, शेती कर्जाचे
पुनर्गठन केल्यास खातं चालू राहील आणि कर्जमाफी मिळणार नाही. त्यामुळे कुठल्याही शेतकऱ्याने शेती कर्जाचे पुनर्गठन करू नये. बुलडाणा जिल्ह्याला सर्वाधिक पिक विमा मिळतो, हे आमच्या सातत्यपूर्ण आंदोलनाचे फलित आहे.
तुपकर म्हणाले की, जी माणसं शेतकरी आंदोलनात शहीद झाली, त्यांची आठवण म्हणून आम्ही छातीवर लाल बिल्ला लावतो. आमचे कार्यकर्ते आक्रमक असले पाहिजेत सामान्य माणसासाठी, शेतकऱ्यांसाठी जो माझ्यासोबत काम करतो, त्याला मी वाऱ्यावर कधीच सोडणार नाही, माझा सामना प्रस्थापित नेत्यांशी आहे, पण कार्यकर्त्यांच्या नादाला लागू नका, घाबरणे हा शब्द माझ्या डिक्शनरीत नाही. कार्यकर्त्यांना संबोधित करतांना तुपकर म्हणाले, जनतेमध्ये जा लोकांच्या सुखदुःखात सामील व्हा, त्यांच्या समस्या सोडवा. लोकांना आधार द्या, स्थानिक स्वराज्य संस्थेत प्रस्थापितांच्या विरोधात नव्या दमाचे उमेदवार देणार आहे. कार्यकर्त्यांच्या पाठीशी राज्यातील संघटना खंबीरपणे सोबत उभी आहे.
जातीच्या नावावर लोक एकत्र येतात, मग मातीच्या लढ्यासाठी का नाही? बुलडाण्याचा हा चळवळीचा वनवा महाराष्ट्रभर पसरला पाहिजे. आजच्या मोठ्या उपस्थितीने दाखवून दिले आहे की, शेतकऱ्यांची एकी कायम आहे. या बैठकीत विविध शेतकऱ्यांनी आपले मनोगत व्यक्त केले. शेवटी तुपकर म्हणाले की, ही क्रांतिकारी शेतकरी संघटना स्वातंत्र्याच्या लढ्याप्रमाणेच एक मोठी चळवळ आहे.
* आमची संघटना तकलादू नाही; लोकसभेसाठी जिवाचं रान करणाऱ्या कार्यकर्त्यांसाठी रक्ताचा शेवटचा थेंब असेपर्यंत लढत राहणार आहोत. सर्व मिळून हा शेतकऱ्यांचा लढा पुढे घेऊन जाऊ आणि शेतकऱ्यांच्या हक्काच्या प्रश्नासाठी लढत राहू.
या कार्यक्रमाला शेतकऱ्यांची व कार्यकर्त्यांची लक्षणीय उपस्थिती होती. सभागृह खच्चून भरले होते. या बैठकीमुळे कार्यकर्त्यांमध्ये नवचैतन्य संचारले आहे. कार्यक्रमाचे संचलन गजानन सोनोने यांनी केले.
