डाक विभागात एजंटसाठी अर्ज मागविले * 12 ऑगस्टला उपस्थित राहण्याचे आवाहन

डाक विभागात एजंटसाठी अर्ज मागविले 
* 12 ऑगस्टला उपस्थित राहण्याचे आवाहन
 
बुलडाणा :( जिमाका : एशिया मंच न्यूज )
         भारतीय डाक विभागाकडून डाक जीवन विमा योजनेंतर्गत जिल्ह्यातील टपाल जीवन विमा योजनेसाठी थेट अभिकर्ता व क्षेत्र अधिकारी यांची नेमणूक करण्याकरिता इच्छुक उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात आले आहेत. इच्छुकांनी आवश्यक कागदपत्रासह 12 ऑगस्ट 2025 रोजी उपस्थित राहावे, असे आवाहन डाकघर अधीक्षक गणेश आंभोरे यांनी केले आहे.
 
         थेट अभिकर्तासाठी अर्जाचा नमुना बुलडाणा प्रधान डाक घर किंवा डाक अधीक्षक बुलडाणा यांच्या कार्यालयात उपलब्ध आहे. एजंट भरतीसाठी उमेदवाराचे किमान वय 18 वर्ष असावे, शैक्षणिक पात्रता किमान दहावी पास असावी. बेरोजगारीत किंवा स्वयंम रोजगारीत शिक्षित युवा, माजी जीवन सल्लागार, इन्शुरन्स कंपनीचे माजी एजंट, माजी सैनिक, अंगणवाडी सेविका, महिला मंडळ सेविका, सेवानिवृत्त शिक्षक व इतर अर्ज करू शकतील. उमेदवाराची निवड थेट मुलाखतीद्वारे व्यावसायिक कौशल्य, व्यक्तिमत्व, परस्पर संबंधाचे कौशल्य, जीवन विम्याबाबत ज्ञानाच्या आधारावर केली जाणार आहे.
 
         निवड झालेल्या उमेदवारास 5 हजार रूपयांची अनामत रक्कम सुरक्षा ठेव म्हणून ठेवावी लागेल. सदर रक्कम राष्ट्रीय बचत प्रमाणपत्र अथवा कृषी विकास पत्राच्या स्वरुपात राहणार आहे. प्रशिक्षण पूर्ततेनंतर डाक विभागाकडून तात्पुरता परवाना देण्यात येईल. हा परवाना आयआरडीएची परवाना परीक्षा पास केल्यानंतर कायमच्या परवान्यामध्ये रुपांतरीत केल्या जाणार आहे. ही परवाना परीक्षा नियुक्तीनंतर 3 वर्षाच्या आत पास करणे अनिवार्य राहिल. निवड झालेल्या उमेदवारास ठरविलेले कमिशन दिले जाणार आहे. इच्छुक उमेदवारांनी अधीक्षक, डाक घर कार्यालय, बुलडाणा 443001 येथे विहित नमुन्यातील अर्ज आणि दहावी किंवा बारावी बोर्डाचे प्रमाणपत्र, जन्मतारखेचे प्रमाणपत्र, संगणक ज्ञानाचे प्रमाणपत्र, यासह सर्व शैक्षणिक प्रमाणपत्र, तसेच पॅन कार्ड, आधार कार्ड व अन्य संबंधित दस्ताऐवजासोबत 12 ऑगस्ट 2025 रोजी 11 ते 2 वाजेदरम्यान उपस्थित राहावे. अधिक माहितीसाठी जवळच्या डाक कार्यालयाशी संपर्क साधावा, असे डाकघर अधीक्षक यांनी कळविले आहे.