लाचखोर जिल्हा पुरवठा अधिकारी 25 हजाराची लाच घेतांना रंगेहाथ अटक
* एसीबी पथकाची कामगिरी
बुलढाणा : (एशिया मंच न्यूज ) शेतकऱ्याला ज्वारी विक्रीचे बिल अदा करण्यासाठी लाचखोर जिल्हा पुरवठा अधिकारी याने 70 हजार रुपयाची मागणी केली असता दरम्यान पहिला हप्ता म्हणून 25 हजार रुपयांची लाच घेतांना जिल्हा पुरवठा अधिकारी गजानन नंदकिशोर टेकाळे याला त्याच्या सहकार्यासह आज 23 जुलै रोजी एसीबी पथकाद्वारे रंगेहाथ पकडण्यात आले.
जिल्हा पुरवठा अधिकारी कार्यालयातच एसीबीच्या पथकाने हा सापळा यशस्वी केला. सदर कारवाईने महसुल विभागासह जिल्हा प्रशासनात एकच खळबळ उडाली आहे. एसीबीने या कारवाईचे गंभीर्य घेत तात्काळ जिल्हा पुरवठा अधिकारी टेकाळे याच्या चिखली निवासस्थानाची कसून चौकशी करीत झाडाझडती घेतली.
एसीबीने प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकानुसार माहिती अशी की, धाड परिक्षेत्रातील एका शेतकऱ्याने शासनाच्या हमी भाव केंद्रावर विक्री केली आहे. या ज्वारीचे बिल निघण्यास कोणतीही अडचण निर्माण होऊ यासाठी भविष्यात ज्वारी विक्रीची प्रक्रिया सुरळीत पार पाडण्यासाठी जिल्हा पुरवठा अधिकाऱ्याकडून 70 हजार रुपये लाचेची मागणी करण्यात आली होती.
यासदंर्भात एसीबीने 21 व 22 जुलै या दोन दिवस खातरजमा केली. जिल्हा पुरवठा अधिकारी टेकाळे हा सेवानिवृत्त कर्मचारी देवानंद खंडागळे याच्या मार्फत सदर शेतकऱ्याशी लाचेचा व्यवहार करीत होता. तडजोड केल्या नंतर 50 हजार रुपये देण्याचे ठरविण्यात आले. यातील 25 हजार रूपये लाचेचा पहिला हप्ता घेवून शेतकरी जिल्हा पुरवठा अधिकारी कार्यालयात आज दुपार दरम्यान पोहोचला. साध्या वेशातील एसीबीच्या पथकानेही कार्यालयात सापळा रचला होता. याचवेळी लाच स्वीकारतांना जिल्हा
पुरवठा अधिकारी टेकाळे यास रंगेहाथ पकडण्यात आले. त्याच्यासोबतच खंडागळेलाही ताब्यात घेण्यात आले. या दोघांविरोधात भ्रष्टाचार प्रतिबंधक अधिनियम 1988 अन्वये गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरु होती.
याठिकाणी मात्र एसीबीला रोख रक्कम मिळून आली नाही. एसीबीच्या या यशस्वी कारवाईचे श्रेय एसीबीचे पीआय रमेश पवार, विलास गुंसीगे, सफौ शाम भांगे, हेकाँ प्रविण बैरागी, राजेंद्र क्षीरसागर, पोना जगदीश जवार, रंजीत व्यवहारे, शैलेश सानेवणे, गजानन गाल्डे, पोकाँ स्वाती वाणी, नितिन शेटे यांनी पार पाडली.