* स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांसाठी काँग्रेस सज्ज
बुलढाणा : (एशिया मंच न्यूज )
काँग्रेस ही चळवळीची जननी तर राष्ट्रीय स्वातंत्र्याची स्फूर्ती आहे. देशहिताचा विचार करणाऱ्या देशभक्तांचा संघटित पुकार हा काँग्रेसचा आरंभ होय. काँग्रेसने उभारलेल्या चळवळीमुळे देशात राष्ट्रीय जागृती झाली आणि त्यातूनच भारत स्वतंत्र झाला. आजतागायत काँग्रेसने कधी विचारधारेशी तत्वांशी प्रतारणा केली नाही. देशात पुन्हा लोकशाही टिकवायची असेल तर काँग्रेच हाच पर्याय आहे. विकास, स्थिरता आणि लोकाभिमुख धोरणांमुळे काँग्रेसवर जनतेचा विश्वास वाढत चालला आहे. आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांसाठी काँग्रेस पक्ष सज्ज झाला आहे, असा निर्धार महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी व्यक्त केला.
सोमवार 21 जुलै रोजी बुलढाणा जिल्हा काँग्रेस कमिटीच्या सर्व आजी व माजी ब्लॉक अध्यक्षांची महत्वाची बैठक उत्साहात पार पडली. यावेळी हर्षवर्धन सपकाळ बोलत होते. ते म्हणाले की, जनतेचा कल पुन्हा काँग्रेसकडे वळत आहे. लोकसभेत आपल्याला चांगले यश मिळाले असून यापुढील निवडणुकांमध्येही काँग्रेस पक्ष मुसंडी मारणार आहे. विद्यमान परिस्थितीत देशात पुन्हा लोकांचे राज्य आणायचे असेल, तर काँग्रेस पक्ष सत्तेवर आला पाहिजे अशी भावना जनमानसात जोर धरू लागली आहे. सत्तर वर्ष काँग्रेसने काय केले? हा प्रश्न विचारणा-यांना सत्तर वर्ष देशातील त्या- त्या वेळच्या पिढ्यांनी सत्तेपासून दूर का ठेवले? हे आताच्या पिढीला उमजू लागले असल्याचेही सपकाळ यांनी सांगितले.
या बैठकीत निवडणुकांची तयारी, संघटनात्मक मजबुती, स्थानिक प्रश्नांची दिशा आणि प्रचाराचे नियोजन अशा विविध मुद्द्यांवर सखोल चर्चा झाली. सर्व पदाधिकाऱ्यांनी येणाऱ्या निवडणुकांमध्ये काँग्रेस पक्षाला मोठे यश मिळावे, यासाठी एकजूट होऊन काम करण्याचा निर्धार केला. याप्रसंगी भगवान धांडे, राजेश मापारी, देवानंद पवार, अतरोद्दीन काजी, अविनाश उमरकर, भाऊराव भालेराव, कैलास देशमुख, रामभाऊ जाधव, राहुल सवडतकर, निना इंगळे, ज्ञानेश्वर शेजोळ, अनिल भारंबे, रामदास डोईफोडे, आतिष कासारे, बंडू चौधरी, समाधान सुपेकर, सुनिल तायडे, तेंजद्रसिह चौव्हाण, पंकज हजारी, राजू वानखेडे, प्रदिप देशमुख, रहीस खां जमदार, राजू पाटील, आश्रु फुके, किशोर भोसले, सतिष टाकळकर, प्रविण कदम यांच्यासह जिल्ह्यातील सर्व आजी, माजी ब्लॉकचे अनुभवी पदाधिकारी उपस्थित होते.
* जिल्ह्यात काँग्रेस पुन्हा एकदा भक्कमपणे उभारी घेईल : राहुल बोंद्रे
बुलढाणा जिल्हा हा काँग्रेसचा बालेकिल्ला राहिला आहे. या जिल्ह्याच्या मातीने अनेक नेते महाराष्ट्रला दिले आहे. प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांचे आश्वासक नेतृत्व राज्याला लाभले आहे. ही आपल्यासाठी गौरवाची बाब आहे. पक्षश्रेष्ठींच्या मार्गदर्शनाखाली आणि कार्यकर्त्यांच्या संघटित प्रयत्नांमुळे बुलढाणा जिल्ह्यात काँग्रेस पुन्हा एकदा भक्कमपणे उभारी घेईल, असा ठाम विश्वास जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष तथा माजी आमदार राहुल बोंद्रे यांनी व्यक्त केला आहे. संपूर्ण जिल्ह्यात पक्ष संघटन मजबूत करण्यासाठी कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांनी कामाला लागावे, असे निर्देशही यावेळी राहुल बोंद्रे यांनी दिले.