रिकाम्या पोटाला आई आठवते ..... रिकाम्या खिशाला बाप आठवतो : प्रा. विनायक फुके

रिकाम्या पोटाला आई आठवते ..... रिकाम्या खिशाला बाप आठवतो : प्रा. विनायक फुके
दे. राजा : (एशिया मंच न्यूज )
         शहरात भारतीय जैन संघटना व आयसीआय कोचिंग क्लासेस यांच्या संयुक्त विद्यमाने फाउंडेशन प्रोग्राम अंतर्गत 22 जुलै रोजी प्रतिभा स्पॉटलाईट ज्ञान गौरव और आशिर्वच समारोह अंतर्गत गुणवंत विद्यार्थ्यांचा सन्मान सोहळ्याचे आयोजन आयसीआय च्या सभागृहात करण्यात आले होते. यावेळी नुकतेच 2024-25 मध्ये झालेल्या वेगवेगळ्या स्पर्धा परीक्षांमध्ये ज्या विद्यार्थ्यांनी चमकदार कामगिरी केली त्यांचा यथोचित सन्मान करण्यात आला.

          यावेळी उपस्थित विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना आयसीआयचे संचालक प्रा. विनायक फुके यांनी सांगितले की, प्रत्येक विद्यार्थ्याने ध्येय निश्चिती करून आपले क्षेत्र निवडावे, कठोर परिश्रम असल्याशिवाय या स्पर्धेच्या युगात टिकणे सोपे नाही. आपल्या रिकाम्या पोटाला जशी आई आठवते व रिकाम्या खिशाला बाप आठवतो तसे या तुमच्या शिक्षणाच आहे ,असे सांगितले . यावेळी मंचकावर श्री व्यंकटेश कला वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयाचे गणित विभाग प्रमुख प्रा. सोपान चव्हाण, बीजेएसचे सन्मती जैन, चाप्टर अध्यक्ष पियुष खडकपूरकर, परमेश्वर पाचरणे उपस्थित होते.

          भारतीय जैन संघटनेचे संस्थापक अध्यक्ष शांतीलाल मुथा, राष्ट्रीय अध्यक्ष नंदकुमार साखला , राज्य अध्यक्ष केतनभाई शहा यांच्या संकल्पनेतून संपूर्ण भारतभर बीजेएस चाप्टरच्या वतीने विविध फाउंडेशन प्रोग्राम घेण्यात येत आहे . त्याचाच एक भाग म्हणून 22 जुलै प्रतिभा स्पॉटलाईट अंतर्गत गुणवंत विद्यार्थ्यांचा सन्मान सोहळ्याचे आयोजन बीजेएस देऊळगावराजा व आयसीआय कोचिंग क्लासेस यांचे संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आला होता. यावेळी विद्यार्थ्यांच्या सन्मान करून भेटवस्तू देण्यात आली. सन्मान सोहळ्यानंतर उपस्थित विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना प्राध्यापक विनायक फुके सरांनी सांगितले की, जगात प्रत्येक क्षेत्रात स्पर्धा वाढलेली आहे . जो गुणवत्ता टिकवेल तो सक्सेस होईल. आज तुमच्याकडे वेळ आहे त्या वेळेचं सोनं करण्यासाठी सर्वांनी प्रयत्न करा, जर तुम्ही आज, सहा तास अभ्यास नाही केला तर उद्या बारा तास मजूरी करावी लागेल, असे सांगून बारावीनंतर शिक्षणाच्या फार मोठ्या संध्या उपलब्ध आहेत मात्र तुम्हाला जे क्षेत्र निवडायचे त्याच दृष्टीने मन लावून अभ्यास करा, असे त्यांनी सांगितले.

         प्राध्यापक सोपान चव्हाण यांनी मार्गदर्शन करताना सांगितले की, बारावीनंतर आर्ट, कॉमर्स ,विज्ञान या शाखेच्या व्यतिरिक्त शिक्षणाचे फार मोठे दालन तुमच्यासाठी खुले आहे. आपला परिवार, आपले मित्र काय सांगतात यापेक्षा आपल्याला कोणत्या क्षेत्रात करिअर करायचे याचा निर्णय स्वतः विद्यार्थ्याने घेण्याचे आवाहन करत शिक्षण घेताना येणारे प्रॉब्लेम त्याच ठिकाणी सोडून घेतल्यास गुणवत्ता वाढीस मदत होते, असे त्यांनी सांगितले. कार्यक्रमाचे संचलन परमेश्वर पाचरणे यांनी केले तर आभार पियुष खडकपूरकर यांनी मानले.