आयुष मंत्रालयाकडून १० उपक्रमांची शृंखला !
बुलढाणा : (एशिया मंच न्युज)
कुठलीही परंपरा जेव्हा वैज्ञानिक दृष्टिकोन ठेवून पुढे जात असते, तेव्हा ती केवळ एक संस्कृती न राहता काळाच्या कसोटीवर उतरणारे समाधान बनते. याचप्रकारे आज भारतीय योग हा वैश्विक आनंदाचे केंद्र बनला आहे. तो तणाव दूर करून आरोग्यतर चांगले ठेवतोच.. परंतु मानव समूहाच्या प्रगतीसाठी सृजनशील मार्गाने वाटचाल करतो. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या प्रेरणेतून व पुढाकारातून, २१ जून हा दिवस संयुक्त राष्ट्र महासंघाच्या सर्वसाधारण सभेने मान्यता देऊन ‘आंतरराष्ट्रीय योग दिन’ ठरविला आहे. संयुक्त राष्ट्र महासंघाच्या ११ डिसेंबर २०१४ च्या झालेल्या बैठकीत सदस्य असलेल्या १९३ देशांपैकी १७७ देशांनी या आंतरराष्ट्रीय योग दिनाच्या ठरावाला मान्यता दिली होती. पहिला योगदिन २१ जून २०१५ रोजी साजरा करण्यात आला. विशेष म्हणजे हा आंतरराष्ट्रीय योग दिन १७७ देशात साजरा होत असून, त्यात ४७ मुस्लीम देशही सहभागी होतात.
२०१५ चा पहिला आंतरराष्ट्रीय योग दिन साजरा झाला होता, नवी दिल्लीतील तत्कालीन राजपथावर, की जो आताचा कर्तव्यपथ आहे. मोदीजींनी त्यावेळी त्याला योगपथ संबोधले होते. २०१६ ला चंदीगड, २०१७ ला लखनऊ, २०१८ ला देहरादून, २०१९ ला रांची, २०२० व २०२१ ला कोरोनामुळे योगदिन ऑनलाईन, २०२२ ला मैसूर, २०२३ ला जबलपूर आणि न्यूयॉर्क अमेरिका तर २०२४ ला श्रीनगर मध्ये आंतरराष्ट्रीय योग दिन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मुख्य उपस्थितीत साजरा झाला. तर यावर्षी २१ जून २०२५ रोजी साजरा होणारा आंतरराष्ट्रीय योग दिन हा आंध्रप्रदेश मधील विशाखापट्टणम येथे शारीरिक, मानसिक आणि आध्यात्मिक कल्याण वाढवणारी जागतिक चळवळ म्हणून प्रोत्साहन देण्याच्या दशकाचा एक महत्त्वाचा टप्पा म्हणून साजरा केला जाणार आहे. यावर्षी योग दिनाची 'योग फॉर वन अर्थ-वन हेल्थ' ही थीम असून १० विशिष्ट कार्यक्रम नियोजित करण्यात आले आहे.
मोदी ३:० पर्व सुरू झाले ११ जून २०२४ रोजी. या तिसर्या पर्वात पंतप्रधान नरेंद्र मोदींसमवेत केंद्रीय मंत्री म्हणून शपथ घेण्याचा 'योग' मला आला, विशेष म्हणजे मोदीजींची आवड असलेल्या 'आयुष' मंत्रालयाचा स्वतंत्र प्रभार मिळाला, हाही योग. पहिलाच कार्यक्रम नरेंद्र मोदींसमवेत २१ जून २०२४ योगदिनी आला. काश्मीरमध्ये, हाही योगायोग, मोदीजींच्या नेतृत्वात देश सर्वच पातळ्यांवर प्रगती करत असताना 'आयुष'ला त्यांनी दिलेले स्थान व त्या माध्यमातून आत्मिक समृद्धीसाठी उचललेले पाऊल अतिशय महत्त्वाचे आहे. योग ही केवळ चळवळच नसून भारतीय आत्म्याची जागतिक अनुभूती आहे.
२०२५ मध्ये २१ जून रोजी ११ वा 'आंतरराष्ट्रीय योग दिवस' साजरा केला जाईल. भारताची ही अमूल्य देणगी समग्र जीवनशैलीचा जागतिक उत्सव ठरली आहे. यंदाचा योग दिन पंतप्रधान नरेंद्र मोर्दीच्या नेतृत्वाखाली विशाखापट्टणम येथे साजरा केला जाणार आहे. २०१४ मध्ये पंतप्रधानांनी ही संकल्पना संयुक्त राष्ट्रांसमोर मांडली अन् आज ती जगभरातील कोट्यवधी लोकांनी आत्मसात केलेली एक जागतिक चळवळ बनली आहे. भारताने दिलेली ही अमूल्य देणगी आज आरोग्य, समरसता आणि समग्र जीवनशैलीचा उत्सव ठरली आहे. योग दिनाच्या दशकपूर्तीचे औचित्य साधत, 'वन अर्थ- वन हेल्थ' हा १०० दिवसांचा उपक्रम आखण्यात आला आहे. हा योगदिन 'हरित योग' म्हणजेच वृक्ष चळवळ 'एक पेड मॉ के नाम' अशा अर्थानेही राबविला जाणार आहे.१० वैशिष्ट्यपूर्ण उपक्रमांसह देशभरात व जगभरात योगाभ्यासाच्या महत्त्वाचा प्रसार केला जाईल.
१० वैशिष्ट्यपूर्ण उपक्रमाअंतर्गत संपूर्ण देशात १ लाख ठिकाणी एकाच वेळी 'योग संगम' अंतर्गत सामूहिक योगाभ्यास, हिमालयातील बफच्छादित गावांपासून ते समुद्रकिनार्यावरील मच्छीमार वसाहतींपर्यत लाखो नागरिक एकत्र योगासने करतील. हे आरोग्य, ऐक्य आणि राष्ट्रीय एकात्मतेचे जिवंत प्रतीक असेल. 'योग बंधन' अंतर्गत जपान सारख्या देशांत भाषा न समजता सुद्धा लोकांना एकत्र आणणारी शक्ती ती म्हणजे योगाभ्यास. १० भागीदार देशांसोबत योग प्रतिनिधींचे परस्पर आदान-प्रदान करून जागतिक मैत्रीस बळ दिले जाईल. 'योग पार्क'च्या माध्यमातून शहरी आणि ग्रामीण भागातील एक हजार सार्वजनिक ठिकाणी कायमस्वरूपी योग आणि आरोग्याच्या दृष्टीने समर्पित 'योग उद्यानां'ची उभारणी. १० विशेष गटांसाठी अनुकूल योगाभ्यासाचा अभ्यासक्रम- मधुमेही, उच्चदाबाचे रुग्ण, महिला, गरोदर स्त्रिया, तृद्ध, मानसिक आरोग्य व व्यसनमुक्ती क्षेत्रातील नागरिक यांना 'योग समावेश' अंतर्गत योग्य मार्गदर्शन. गेल्या १० वर्षातील प्रगतीचे संशोधन आणि आकडेवारीसह दस्तावेजीकरण. दिल्लीतील एका शिक्षिकेला योगाभ्यासामुळे विद्यार्थ्याच्या एकाग्रतेत सुधारणा दिसली. चेन्नईतील एका उद्योजकाचा रक्तदाब योगाभ्यासामुळे नियंत्रित झाला, अशा अनुभवांचे संकलन 'योग प्रभाव' अंतर्गत होईल. हायब्रिड स्वरूपात जागतिक परिषद- योगतज्ज्ञ, धोरणकर्ते, आरोग्य क्षेत्रातील तज्ज्ञ आणि प्रभावशाली व्यक्तींना एकत्र आणणारा चर्चामंच म्हणजेच 'योग कनेक्ट'. हरित योगच्या माध्यमातून निसर्गाशी एकरूपता साधत पर्यावरणपूरक कृर्तीसोबत योगाभ्यास. तरुणांपर्यंत पोहोचण्यासाठी ऑनलाइन आणि ऑफलाइन नवकल्पनाशील स्वरूपे पारंपरिक योगाभ्यास आणि आधुनिक संगीत व नृत्य यांचे मिश्रण' योग अनप्लग्ड' माध्यमातून करण्याचे नियोजन आहे. 'योग संयोग' अंतर्गत योग व आयुर्वेद, सिद्ध, युन्ाानी, होमिओपथी, निसर्गोपचार, सोवा रिग्पा यांसारख्या पद्धर्तीचा आधुनिक आरोग्य व्यवस्थेशी संयोग वैज्ञानिक आधारासह प्रस्तुती.
आंतरराष्ट्रीय योग दिनाच्या या दशकपूर्तीनिमित्त प्रत्येक भारतीयाला आवाहन करतो की, तुम्ही अनुभवी योगसाधक असाल किंवा तुम्हाला एकाही आसनाचा अनुभव नसेल तरी या उत्सवात सहभागी व्हा. स्वतः अनुभव घ्या. कारण या प्राचीन पद्धतीत आधुनिक आरोग्याची खरी गुरुकिल्ली दडलेली आहे. आज भारत योगाभ्यासाच्या माध्यमातून संपूर्ण मानवजातीसाठी समग्र आरोग्याचा मार्ग दाखवीत आहे. ही भारताची विश्वाला दिलेली देणगी होय, जी अक्षय राहील. २१ जून रोजी पंतप्रधान मोदी हजारो लोकांसमवेत योगासने करतात, तेव्हा आपला आरोग्यप्रति असलेला राष्ट्रीय संकल्प दृढ होतो. योगाभ्यास म्हणजे फक्त आसने किंवा शारीरिक व्यायाम नाही तर तो आपल्या आरोग्याचा, मनःशांतीचा व आत्मिक समृद्धीचा मार्ग आहे. या दशकपूर्तीच्या ऐतिहासिकप्रसंगी प्रत्येक घरात, प्रत्येक मनात योगाभ्यास रुजवायचा संकल्प करूया. आपल्या भागात आयोजित होणार्या योग संगमात सहभागी व्हा. आपल्या कुटुंबाला, शेजार्यांना, मित्रमंडळींना सोबत घेण्याचा संकल्प करा.
* यावर्षीचा योग महाकुंभ :
यावर्षी प्रयागराज मध्ये महाकुंभ झाला, आता आरोग्यासाठी यावर्षी योग महाकुंभ साजरा करण्यात येणार आहे. मागील १० प्रमुख योग दिवस साजरा केलेल्या शहरांमध्ये आठवडाभर चालणारे महोत्सव सामुदायिक सहभागातून योगाचा उत्सव साजरा केला जाईल. कॉलेजमध्ये शिकताना आजोबांच्या आग्रहामळे योगासने मी सुरु केली, पण आज माझी प्रत्येक सकाळ सूर्यनमस्काराशिवाय पूर्णच होत नाही. मानसिक संतुलन आणि दिवसभरासाठीची ऊर्जा त्यातून मिळते. त्यामुळे योगा ऊर्जादायी व स्फूर्तीदायी ठरतो !
* ना.प्रतापराव जाधव
केंद्रीय आयुष (स्वतंत्र प्रभार ), आरोग्य व कुटुंब कल्याण राज्यमंत्री, नवी दिल्ली.
(शब्दांकन : राजेंद्र काळे, पत्रकार बुलढाणा. मो.नं.९८२२५९३९२३)