* राजकारण नाही, विकासच माझा अजेंडा : आमदार सिद्धार्थ खरात
मेहकर : (एशिया मंच न्युज)
मेहकर शहरातील लघु व्यावसायिक आणि अतिक्रमण धारकांसाठी मोठी दिलासादायक बातमी आहे. १८ जून २०२५ रोजी बसस्टॉप समोरील आरक्षित भूखंड क्रमांक २९, ३० व ३१ येथे शारंगधर बालाजी व्यापारी संकुलातील ३२० दुकानांच्या बांधकामाचे भूमिपूजन केंद्रीय आयुष मंत्री प्रतापराव जाधव व आमदार सिद्धार्थ खरात यांच्या हस्ते पार पडले.
न्यायालयाच्या आदेशानुसार शहरातील लोणार फाटा ते तहसील कार्यालय, डोणगाव रोड आणि जानेफळ रोडवरील अतिक्रमण हटवण्यात आले होते. यामुळे लघु व्यावसायिकांचे रोजगाराचे मोठे संकट निर्माण झाले होते. हे संकट दूर करण्यासाठी आमदार सिद्धार्थ खरात यांनी सातत्याने पाठपुरावा करत केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधव यांच्या सहकार्याने हा महत्वपूर्ण निर्णय घेतला.
एकूण ३२० दुकानांपैकी २५५ दुकानांना अतिक्रमणधारक टपरीधारकांना प्राधान्य देण्यात येणार असून उर्वरित दुकानांतून बचत गटातील महिला, विधवा, दिव्यांग यांना संधी दिली जाणार आहे. या गाळ्यांचे लवकरच सुसज्ज रूपात वितरण करण्यात येईल, अशी ग्वाही आमदार खरात यांनी दिली.
मेहकर शहराच्या विकासासाठी आम्ही नेहमी कटिबद्ध आहोत. या प्रकल्पाच्या माध्यमातून शेकडो कुटुंबांना नवसंजीवनी मिळेल. विकासाच्या आड राजकारण येऊ देणार नाही," असे ठाम वक्तव्य त्यांनी यावेळी केले.
भूमिपूजन सोहळ्यास मुख्याधिकारी रामराजे कापरे, शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) उपजिल्हा प्रमुख प्रा. आशिष रहाटे, शहर प्रमुख किशोर गारोळे, युवासेना ॲड. आकाश घोडे, ॲड. संदीप गवई, तसेच नगर परिषद अधिकारी, कर्मचारी, नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.