* महावितरणच्या कार्यकारी अभियंत्याची तत्परता; काही मिनिटांत जवानाच्या घरचा विद्युत पुरवठा केला सुरळीत
बुलढाणा : (एशिया मंच न्युज)
जम्मू काश्मीरच्या श्रीनगर बॉर्डरवर तैनात असलेल्या सैनिकाचा रात्री नऊ वाजता कॉल आल्यावर सुद्धा सकारात्मक प्रतिसाद देत महावितरणचे कार्यकारी अभियंता सुरेंद्र कटाके यांनी काही मिनिटांतच त्यांचा प्रॉब्लेम सॉल केला. इतक्या उशिरा अधिकारी फोन उचलतील याची गॅरंटी नसते. मात्र महावितरण अभियंता यांनी कार्य तत्परतेचा परिचय देत सैनिकांचा सन्मान केला आहे.
बुलढाणा येथील रमेश सोनुने हे बीएसएफमध्ये देशसेवेत आहेत. सध्या ते श्रीनगर बॉर्डरवर तैनात आहेत. बुलढाणा येथील मलकापूर रोडवरील डॉल्फिन स्विमिंग पूल शेजारी त्यांचे घर आहे. याठिकाणी त्यांची पत्नी आणि मुले राहतात. बुधवारी सकाळपासून त्यांच्या घरातील वीजपुरवठा अचानक खंडित झाला होता. कुटुंबीयांनी याबाबत संबंधीत वायरमनला तीन ते चार वेळेस फोन केला. मात्र रात्रीचे नऊ वाजले तरी त्यांच्याकडून कुठलाच प्रतिसाद मिळाला नाही. परिणामी सैनिक कुटुंब त्रस्त झाले होते. अशातच रमेश सोनुने यांचा दररोजप्रमाणे घरी फोन आला. पत्नीने विजेची समस्या त्यांच्या कानावर टाकली. कुटुंब अंधारात असल्याने व्यथित झालेल्या सैनिकाने थेट महावितरणचे कार्यकारी अभियंता सुरेंद्र कटके यांना फोन केला. लागलीच सूत्रे हलवीत साहेबांनी यंत्रणा कामाला लावली. काही मिनिटांतच जवानाच्या घरातील वीजपुरवठा सुरळीत केला. पावसाळा सुरू असून विजेच्या समस्या वाढल्या आहेत. महावितरणच्या कर्मचाऱ्यांवर याचा ताण पडणे सहाजिक आहे. असे असतांना सुद्धा कार्यकारी अभियंत्यांनी यंत्रणा कामाला लावून त्वरित समस्या मार्गी लावली. प्रशासनातील अधिकाऱ्यांकडून अशाच कार्यप्रणालीची अपेक्षा आहे.
*जय जवान! जय किसान !
माजी पंतप्रधान दिवंगत लालबहाद्दूर शास्त्री यांनी जय जवान! जय किसान!हा नारा दिला होता. सैनिक डोळ्यात तेल घालून देशाच्या सीमेचे रक्षण करीत असल्याने आपण निवांत झोप घेऊ शकतो. सैनिकांमुळे देशातील नागरिक सुरक्षित आहेत. त्यामुळे सैनिक आणि त्यांच्या कुटुंबियाबद्दल सौजन्याने वागले पाहिजे. तर देशाचा किसान म्हणजे आपला बळीराजा शेतात राबतो म्हणून आपणास धान्य मिळते. शेतकऱ्यांनी पिकवलेच नाही तर उपासमारीची वेळ येईल. जवान आणि किसान दोघांचेही कार्य महान आहे. माजी पंतप्रधान लालबहाद्दूर शास्त्री यांनी त्यांच्या कार्याचा गौरव म्हणून जय जवान! जय किसान! हा नारा दिला होता. सैनिक आणि शेतकऱ्यांविषयी आत्मीयता दाखवणे आपले कर्तव्य आहे, याची सुजाण नागरिकाने जाणीव ठेवणे गरजेचे आहे.