बाळशास्त्री जांभेकर सन्मान योजनेतील जाचक अटी रद्द करा * जिल्हाध्यक्ष शौकत शाह यांची निवेदनाद्वारे मागणी

बाळशास्त्री जांभेकर सन्मान योजनेतील जाचक अटी रद्द करा 
* जिल्हाध्यक्ष शौकत शाह यांची निवेदनाद्वारे मागणी
बुलढाणा : (एशिया मंच न्युज)
      ज्येष्ठ पत्रकारांसाठी शासनाने सुरू केलेल्या बाळशास्त्री जांभेकर सन्मान योजने मधील जाचक अटी रद्द करून वयाची साठ वर्षे पूर्ण झालेल्या व ज्याना राज्य शासनाच्या वतीने ज्येष्ठ पत्रकार म्हणून आधीस्वीकृती पत्रिका प्रदान केली आहे, अशा सर्व ज्येष्ठ पत्रकारांना बाळशास्त्री जांभेकर सन्मान योजनेमध्ये समावेश करून दरमहा आर्थिक मदत करण्यात यावी, अशी मागणी असोसिएशन ऑफ स्मॉल अँड मिडीयम न्यूज पेपर ऑफ इंडिया या संघटनेचे बुलढाणा जिल्हाध्यक्ष शौकत शाह यांनी महासंचालक, माहिती व जनसंपर्क संचालनालय, मुंबई यांच्याकडे जिल्हा माहिती अधिकारी बुलढाणा यांच्या मार्फत आज 19 जून रोजी दिलेल्या निवेदनात केली आहे. 
      दिलेल्या निवेदनात शौकत शाह  यांनी पत्रकाराच्या प्रलंबित प्रश्नाबाबत शासनाने विचारलेल्या बाबी विचारात घेऊन पुढे असे म्हटले आहे की, शंकरराव चव्हाण स्मृती पत्रकार कल्याण निधी योजनेमध्ये निधीची वाढ करून ज्या आजारांना जास्त खर्च येतो अशा सर्व आजारांचा या योजनेमध्ये समावेश करावा. उदाहरणार्थ किडनी, हृदयरोग, हृदयाशी संबंधित सर्व आजार, पोटाचे विकार, मानेचे विकार , मेंदूचे विकार, भयानक तापेतून उद्भवणारे आजार , डोळ्याचे ऑपरेशन, अपघात या सर्वांचा समावेश करून या आजारासाठी वैद्यकीय खर्च जितका येतो, तितकी मदत शंकरराव चव्हाण पत्रकार कल्याण निधीतून करण्यात यावी, अशी मागणी ही सदर निवेदनात करण्यात आली आहे. 
     त्याचप्रमाणे कार्यरत असलेल्या पत्रकाराचा किंवा सेवानिवृत्त झालेल्या पत्रकाराचा अपघाती किंवा नैसर्गिक मृत्यू झाला तर त्यांच्या वारसांना शासनाच्या वतीने भरीव अशी आर्थिक मदत केली पाहिजे, इतर बाबतीत ज्याप्रमाणे शासनाने प्रत्येकाना मदत करते त्या धर्तीवर शासनाने जास्तीत जास्त रक्कम पत्रकारांच्या वारसाला दिली पाहिजे. महत्त्वाचे म्हणजे बाळशास्त्री जांभेकर सन्मान योजनेमध्ये ज्येष्ठ पत्रकारांचा समावेश करताना क्षुल्लक कारण देऊन ज्येष्ठ पत्रकारांचे अर्ज नामंजूर करण्यात येत आहेत, ही चुकीची बाब असून ज्येष्ठ पत्रकार ज्यांचे वय 60 वर्षे आहे आणि ज्यांनी २५ वर्षे पत्रकारिता केली आहे, आशा सर्व ज्येष्ठ पत्रकारांना बाळशास्त्री सन्मान योजनेत समाविष्ट करून सर्वांना आर्थिक मदत करावी , अशी आग्रही मागणी सदर निवेदनामध्ये करण्यात आली आहे. याचबरोबर इतर ही दहा ते पंधरा मागण्यांचे निवेदन संघटनेच्या वतीने देण्यात आले आहे. 
       जिल्हा माहिती कार्यालयात हे निवेदन जिल्हा माहिती सहाय्यक सतीश बघमारे, प्रतीक फुलाडी, प्रेमनाथ जाधव, जयंत वानखेडे, राम पाटील, श्रीमती श्रेया दाभाडकर  यांनी स्वीकारले. यावेळी संघटनेच्या वतीने राज्य सचिव प्रा. सुभाष लहाने, जिल्हाध्यक्ष शौकत शाह, प्रेमकुमार राठोड यांची उपस्थिती होती.