माळेगाव येथील अतिक्रमण हटविल्याने अतिक्रमणधारकांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोरच थाटला संसार
बुलढाणा : (एशिया मंच न्यूज) मोहेगाव जवळ असलेल्या माळेगाव येथील वनविभागाने 750 हेक्टरवरील अतिक्रमण हटविल्याने जवळपास शंभर ते सव्वाशे अतिक्रमणधारकांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन करीत घरातील सर्व साहित्य आणून आज रात्री 9 वाजता उघड्यावर संसार मांडला आहे. त्यामुळे यंत्रणेची धांदल उडाली.
याबाबत मिळालेली माहिती अशी की, मोहेगाव जवळ असलेल्या माळेगाव येथील वनविभागाने 750 हेक्टरवरील वनजमिनीवर 30 ते 35 वर्षापासून वास्तव्यात असलेले ग्राम माळेगाव येथील वनविभागाने ग्रामस्थांच्या राहत्या जागेवरील अतिक्रमण हटविले आहे. त्यामुळे त्यांचा संसार उघड्यावर आला आहे. त्यामुळे संतापलेल्या शंभाराहून अधिक नागरिकांनी अचानक मोठा निर्णय घेत येथील जिल्हाधिकारी कार्यालयासमोर घरातील सर्व साहित्य घेऊन उघड्यावरच संसार थाटला.
'घर द्या नाही तर पर्यायी जागा द्या' म्हणत ठिय्या मांडला. रात्री 9.30 वाजेपर्यंत येथे पोलिसांचा मोठा फौजफाटा तैनात होता. दरम्यान प्रशासनाशी चर्चा होऊन या नागरिकांना समाज कल्याण कार्यालयाच्या ठिकाणी तात्पुरता निवारा देण्यात आल्याची माहिती प्राप्त झाली आहे.