बुलढाणा : (एशिया मंच न्यूज)
स्व. राजेंद्रजी श्रीवास्तव समाजकार्य महाविद्यालयाच्या एम.एस.डब्ल्यु (M.S.W.). पारध भाग १ च्या विद्यार्थ्यांनी प्राचार्य आर.ए. कदम यांच्या मार्गदर्शनात व प्रा.एस.बी वाघ यांच्या नेतृत्वामध्ये कवी कुलगुरू कालिदास संस्कृत विद्यापीठाच्या अभ्यास क्रमानुसार क्षेत्रकार्य अध्ययन उपक्रमा अंतर्गत सखी - बुलढाणा येथील वन स्टॉप सेंटर ला 13 मे 2025 ला भेट देण्यात आली. कार्यक्रमाचे प्रस्ताविक प्रा. एस बी. वाघ यांनी केले.
याप्रसंगी सखी वन स्टॉप सेंटरच्या केंद्र प्रशासक आशा बोर्डे मॅडम यांनी संस्थेमार्फत राबविण्यात येणारे विविध प्रकल्प, संस्थेचे ध्येय धोरण, लाभार्थी प्रवेश प्रक्रिया दिल्या जाणाऱ्या सोयी सुविधा, सखी-वन स्टॉप सेंटरमध्ये मोफत मिळणाऱ्या सुविधा या विषयी सविस्तर माहीती देवुन मार्गदर्शन केले. एकाच छताखाली तात्पुरता निवारा, वैद्यकिय सेवा, पोलीस सुविधा, कायदेशिर समुपदेशन, तात्काळ सेवा, दरचित्रवाणी संमलेन इत्यादी विषयी माहीती देवून विद्यार्थ्यांनी विचारलेल्या प्रश्नाची समर्पक उत्तरे दिली. सोबतच मनोसामाजिक समुपदेशन विषयी आपले मनोगत व्यक्त केले. तर अॅड. अंजना घोंगडे यांनी संकट ग्रस्त महीलांना मोफत २४ तास सेवा तत्काळ मदत, कौटुंबिक हिंसाचारापासुन महिलांचे संरक्षण कायदा, बलात्कार, फसवणुक व परिस्थीती अनुरुप अत्याचाराला बळी पडलेल्या संकटग्रस्त महीलांना मदत व उपचार कशी मिळवुन दिले जाते या विषयी मार्गदर्शन केले. ज्योती जाधव यांनी संकटग्रस्त महिलांना सोबत काम करतांना येणारे अनुभव कथन केले. अभार प्रदर्शन संतोष नारायण गवई या विद्यार्थ्याने केले. याप्रसंगी स्व. हरिवंश राय बच्चन बहुउद्देशीय सेवाभावी संस्थेमार्फत संचालित स्व. राजेंद्रजी श्रीवास्तव समाजकार्य महाविद्यालय पारध येथे एम.एस.डब्ल्यु (M.S.W.) या अभ्यासक्रमास प्रवेश घेऊन व अभ्यास पूर्ण करून शास्त्रीय पद्धतीने समुपदेशन करण्याचे आवाहन संस्थेचे सचिव विक्रांत श्रीवास्तव यांनी केले. यावेळी एम.एस.डब्ल्यु (M.S.W.) भाग १ चे बहुसंख्य विद्यार्थी उपस्थीत होते.