* जात धर्म व पक्ष विरहित देशभक्तांनी तिरंगा रॅलीसाठी एकत्र यावे : आ. सौ. श्वेताताई महाले
चिखली : (एशिया मंच न्युज)
आपण सुरक्षित आणि आनंदी जीवन जगत आहात कारण देशाच्या सीमेवर सैनिक अहोरात्र सजग असतो. आपण सैनिकांच्या बलिदानाचा सन्मान केला पाहिजे. देशासाठी काहीतरी करण्याची जाणीव प्रत्येक नागरिकाच्या मनात असायला हवी. सैनिकाचे जीवन हे त्याच्या कुटुंबासाठी, समाजासाठी, आणि देशासाठी बलिदान असते. एका सैनिकाचे बलिदान हे केवळ त्याचे जीवन देण्यात नाही, तर त्याच्या स्वप्नांचा, इच्छांचा आणि व्यक्तिगत सुखांचा त्याग करण्यातही असते. जेव्हा सैनिक आपल्या सर्व सुखांचा त्याग करून तिथे आपल्यासाठी उभा आहे, तेव्हा त्याचे सुरक्षा व मनोबल वाढवण्यासाठी आपण ईश्वराला प्रार्थना तर नक्कीच करू शकतो. मातृभूमीच्या ज्या पुत्रांच्या बलिदानामुळे आपण देशाच्या अंतर्गत भागात अतिशय आनंदाने जीवन जगत आहोत, त्या भारतीय सैनिकांच्या सुरक्षा व मनोबल वाढवण्यासाठी भारतीय नागरिकांच्या तिरंगा रॅलीचे आयोजन आपण केले आहे. या शब्दांमध्ये आमदार सौ. श्वेताताई महाले पाटील यांनी सैनिका प्रति असलेल्या त्यांच्या संवेदना बोलून दाखवल्या.
सध्या सुरु असलेल्या भारत -पाकिस्तान युद्धाच्या पार्श्वभूमीवर आपल्या सुरक्षेसाठी सिमेवर लढत असलेल्या आपल्या भारतीय जवानांच्या सुरक्षेसाठी आणि त्यांचे मनोबल वाढवन्यासाठी 17 मे 2025 शनिवार रोजी चिखली शहरांमध्ये तिरंगा रॅलीचे आयोजन करण्यात आले आहे. ही तिरंगा रॅली जात, धर्म, पक्ष विरहित असून कोणत्याही पक्षाचे झेंडे या रॅलीमध्ये दिसणार नाही. तर एक भारतीय म्हणून फक्त भारत देशाचा प्राणप्रिय "तिरंगा झेंडा" या रॅलीचा दिशादर्शक असणार आहे.
तालुका क्रीडा संकुल चिखली येथून सुरू होणारी ही तिरंगा रॅली, छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्या जवळून जयस्तंभ चौक मार्गे अशोक वाटिका येथे समाप्त होणार आहे. तरी या तिरंगा रॅलीमध्ये बहुसंख्य लोकांनी तालुका क्रीडा संकुल चिखली येथे हजर राहून आपली उपस्थिती दर्शवावी, असे आवाहन चिखली विधानसभा मतदारसंघाच्या आमदार सौ. श्वेताताई महाले पाटील यांनी केले आहे.