चेक बाऊन्सप्रकरणी दोन महिने शिक्षेसह एक लाखाचा दंड* राजर्षी शाहू मल्टिस्टेट मंगरूळ नवघरे शाखेचे प्रकरण ; कर्ज हलक्यात घेणे भोवले

चेक बाऊन्सप्रकरणी दोन महिने शिक्षेसह एक लाखाचा दंड
* राजर्षी शाहू मल्टिस्टेट मंगरूळ नवघरे शाखेचे प्रकरण ; कर्ज हलक्यात घेणे भोवले  
चिखली : (एशिया मंच न्युज)
         कर्ज हलक्यात घेणे कर्जदारास चांगलेच भोवले आहे. चेक बाऊन्सप्रकरणी तालुक्यातील मंगरूळ नवघरे येथील समाधान दौलत वाकडे यास दोन महिन्याची शिक्षा व एक लाख रुपये दंड ठोठावण्यात आला आहे. चिखली दिवाणी व फौजदारी न्यायालयाचे प्रथमवर्ग न्यायाधीश एच. डी. देशींगे यांनी हा निकाल दिला.

        व्यावसायिक समाधान दौलत वाकडे याने राजर्षी शाहू मल्टिस्टेट को- ऑप. क्रेडिट सोसायटी मर्या. बुलढाणा( र. न. ८१९) च्या मंगरूळ नवघरे शाखेतून २३ एप्रिल २०१८ रोजी १० लाख रुपयांचे कॅश क्रेडिट कर्ज घेतले होते. कर्जाचे हप्ते थकल्याने परतफेडीसाठी कर्जदाराने एका राष्ट्रीयकृत बँकेचा चेक दिला होता. मात्र संबधीत खात्यात पुरेशी रक्कम नसल्याने चेक परत आला. दरम्यान वसुलीसाठी पतसंस्थेकडून कर्जदारास नोटीस बजावण्यात आल्या. परंतु त्याने कुठलीच दखल घेतली नाही. त्यामुळे शाखा व्यवस्थापक शिवप्रसाद कणखर यांनी न्यायालयात दावा दाखल केला. दोन्ही बाजूंच्या युक्तिवादानंतर व साक्ष पुराव्यांवरून न्यायालयाने कर्जदारास दोन महिने शिक्षा व एक लाख रुपये दंडाचा आदेश दिला. फिर्यादीतर्फे ऍड. जयश्री कुटे यांनी बाजू मांडली.