सुंदरखेडला समस्यांचा विळखा ; वंचित युवा आघाडी छेडणार आंदोलन

सुंदरखेडला समस्यांचा विळखा ; वंचित युवा आघाडी छेडणार आंदोलन 
बुलडाणा : (एशिया मंच वृत्त)
         जिल्हा मुख्यालयाला लागूनच असलेले सुंदरखेड हे गाव शहराचा विस्तारित भाग आहे. मात्र, ग्रामपंचायत प्रशासनाच्या अक्षम्य दुर्लक्षामुळे नागरिक विविध समस्यांना तोंड देत आहेत. या समस्या आठवडाभरात सोडवाव्यात; अन्यथा उग्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा वंचित बहुजन युवा आघाडीचे जिल्हाध्यक्ष सतीश पवार यांनी दिला आहे.
      जनतेच्या जटील समस्या गांभीर्याने घेतल्या जात नसल्याने अखेर जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन सादर करण्यात आले. सुंदरखेड हे ग्रामपंचायत कार्यक्षेत्रात येत असलेतरी बुलडाणा शहराप्रमाणे या भागामध्ये पक्क्या घरांची वसाहत निर्माण झाली आहे. बहुतांश कर्मचारी वर्ग या भागात राहाते. शंभर टक्के साक्षरता असलेली ही वसाहत आहे. परंतु या भागामध्ये राजकीय उदासीनतेमुळे पायाभूत, मूलभूत सुविधांचा अभाव आहे. याचा नागरिकांना त्रास सोसावा लागतो.
      चिखली रोडवर पथदिवे कार्यान्वित करण्यात यावेत, ओला व सुका कचरा वाहून नेण्यासाठी घंटागाडीची व्यवस्था करण्यात यावी, डुक्कर, कुत्रे, गायी, बकऱ्या यासारख्या मोकाट जनावरांचा बंदोबस्त करण्यात यावा, अंतर्गत रस्त्यांचे कॉंक्रिटीकरण करण्यात यावे, सुंदरखेड परिसरातील गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी किमान प्रत्येक चौकामध्ये सीसीटीव्ही कॅमेरे लावण्यात यावे, मृत जनावरे ओढून नेण्यासाठी किंवा त्यांची विल्हेवाट लावण्यासाठी सर्विस नंबर सुविधा चालू करण्यात यावी, या मागण्यांकडे वंचित बहुजन युवा आघाडीचे जिल्हाध्यक्ष सतीश पवार यांनी लक्ष वेधले आहे. सात दिवसांच्या मुदतीत समस्या मार्गी लावाव्यात; अन्यथा आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा देण्यात आला आहे.
         निवेदन देताना जिल्हा संघटक बाला राऊत, जिल्हा उपाध्यक्ष राजू वाकोडे, जिल्हा महासचिव अर्जून खरात, सतीश गुरचवळे, विजय पवार, दिलीप वाघमारे, सुरेश जाधव, जि.प. सर्कलप्रमुख अनिल पारवे, संजय काकडे, योगेश हिवाळे, समाधान पवार, किरण पवार, राहुल बनसोडे, सचिन हिवाळे, ॲड. सुरडकर यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

* बसथांब्यांची सुविधा द्या;
         वरवंडपर्यंत चौपदरीकरण करा,
महाबोधी बुद्धविहार, धम्मगिरी, मलकापूर रोड बुलढाणा व चांडक लेआउट चिखली रोड बुलडाणा या ठिकाणी बस थांब्याची (एसटी स्टॉप) ची व्यवस्था करण्यात यावी, अपघातांचे प्रमाण लक्षात घेता किमान त्रिशरण चौक ते वरवंड फाटा खामगाव रोडपर्यंत रस्त्याचे चौपदरीकरण करण्याचीही मागणी करण्यात आली आहे.