* खैरव येथे बुद्धविहार लोकार्पणाचा मंगल सोहळा
बुलढाणा : (एशिया मंच न्यूज )
मातृतीर्थ बुलडाणा जिल्ह्यातील ग्राम खैरव तालुका चिखली येथील मैत्रेय बुद्धविहारात तथागत भगवान बुद्धरूपाची प्रतिष्ठापन तसेच बुद्धविहाराचे लोकार्पण व संघदान सोहळा मोठ्या उत्साहात अत्यंत मंगलमय वातावरणात संपन्न झाला. सर्व प्रथम महाकरूणीक तथागत भगवान गौतम बुद्धांच्या व महामानव विश्वरत्न घटनेचे शिल्पकार डॅा. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे दिप धुपाने पुजन करण्यात आले. नंतर बुध्द वंदना त्रिशरण पंचशिला घेत कार्यक्रमाची सुरुवात झाली. विहारांचे मान्यवरांच्या व उपस्थितीतांच्या हस्ते लोकार्पण करण्यात आले.
यावेळी महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री यांचे खाजगी सचिव या जिल्ह्याचे भूमीपूत्र कर्तव्यदक्ष अधिकारी विद्याधरजी महाले यांच्या प्रमुख उपस्थितीत शुभहस्ते व चिखली मतदार संघाच्या माजी आमदार रेखाताई खेडेकर यांच्या अध्यक्षतेखाली चिखली तालुक्यातील खैरव येथील मैत्रेय बुध्दविहाराचे लोकार्पण व बुध्दरूपाची प्रतिष्ठापना तसेच संघदान सोहळा पार पडला.
यावेळी विद्याधरजी महाले यांनी बोलताना म्हटले की, तथागत बुध्द यांनी सर्व जगाला शांतीचा मार्ग दाखविला त्याच मार्गावर सर्वांनी एक दिलाने राहावे, आपण सर्व एक आहोत तेव्हा सर्वांनी आपल्या शहरात गावात गुण्या गोविंदाने रहावे जातीभेद न करता बुध्दांचा शांतीचा मार्ग धरावा, बुध्दाच्या तत्वावर व डॅा.बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांवर जो देश समाज या कुटुंब चालले त्यांची प्रगती झाली शिवाय राहत नाही. डॅा. बाबासाहेब आंबेडकर व गौतम बुध्दांकडे जातीच्या नजरेतून पाहू, नये त्यांचे विचार व तत्त्वज्ञान आत्मसात करावे, असे प्रतिपादन या मंगलमय प्रसंगी मुख्यमंत्री यांचे खाजगी सचिव महाले यांनी मांडले.
यावेळी नीताताई सोळंकी तालुका अध्यक्ष भाजप महिला आघाडी, भाई विजय गवई जिल्हा अध्यक्ष पीरिपा, बाळू भिसे, खैरव सरपंच गजानन शिंदे, शिवाजीराव कुटे यांच्यासह गावातील उपासक, उपासिका तसेच परिसरातील असंख्य मान्यवर उपस्थित होते.
तथागत भगवान बुद्धांच्या करुणा, समता आणि शांततेच्या विचारांचा प्रसार समाजात अधिकाधिक व्हावा, हीच सर्व मान्यवरांनी उपस्थितीताना सदिच्छा मंगल मैत्री दिली. कार्यक्रमाचे सुत्रसंचलन पीरीपाचे जिल्हाध्यक्ष भाई विजय गवई यांनी केले. सरणय गाथेने या मंगलमय कार्यक्रमाची सांगता झाली.
